फेरीवाले कृती समितीचा कोल्हापूर महानगरपालिकेवर सोमवारी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:58 PM2017-12-08T18:58:31+5:302017-12-08T19:03:20+5:30
महापौर, आयुक्त आणि फेरीवाले कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतील निर्णयांविरोधात महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे. ही कारवाई फेरीवाल्यांवर अन्याय करणारी आहे.
कोल्हापूर : महापौर, आयुक्त आणि फेरीवाले कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतील निर्णयांविरोधात महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे. ही कारवाई फेरीवाल्यांवर अन्याय करणारी आहे.
याविरोधात सोमवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीने शुक्रवारी घेतला. महापालिका प्रशासनाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार आणि ‘निर्मूलन नको, नियोजन करा’ अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने सरसकट फेरीवाल्यांना विस्थापित केले असल्याचा आरोप सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीचा आहे. प्रशासनाच्या संबंधित कारवाईबाबत पुढील धोरण ठरविण्यास कृती समितीची व्यापक बैठक महाराणा प्रताप चौक येथे झाली. अध्यक्षस्थानी महंमदशरिफ शेख होते.
बैठकीच्या प्रारंभी समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी उपस्थितांना सूचना, मत मांडण्यास सांगितले. त्यावर अधिकतर जणांनी महानगरपालिका प्रशासनाकडून सरसकट सुरू असणारी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई फेरीवाल्यांवर अन्याय करणारी आहे. त्याच्या विरोधात लढा देण्याची भूमिका मांडली.
महंमद शेख म्हणाले, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेबाबत आयुक्त, प्रशासन हे बेजबाबदारपणे काम करत आहे. फेरीवाल्यांना न्याय मिळण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. निमंत्रक पोवार म्हणाले, आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय समन्वय समिती घेईल.
या समितीत सुभाष वोरा, दिलीप पोवार, महंमदशरिफ शेख, प्र. द. गणपुले, रमाकांत उरसाल, समीर नदाफ यांचा समावेश आहे. ही समन्वय समिती आंदोलनाबाबत जो निर्णय घेईल. त्याची अंमलबजावणी कृती समिती करेल.
या बैठकीस राजेंद्र महाडिक, नजीर देसाई, विजय नागांवकर, दिलीप खोत, किरण गवळी, रियाज कागदी, तय्यब मोमीन, आदी उपस्थित होते. दरम्यान, या व्यापक बैठकीनंतर समन्वय समितीची बैठक झाली. त्यात निर्मूलन नको, आधी पुनर्वसन, नियोजन करा’ अशी मागणी करत कृती समितीतर्फे सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीतील सूचना, मते
- सुभाष वोरा : आता भाषण पुरे, चर्चा व मेळावे नको. आंदोलन करावे.
- दिलीप पोवार : प्रशासनाविरोधात लढा देण्याची तयारी ठेवा, तरच जगायला मिळेल.
- नंदकुमार वळंजू : अन्याय होत असेल, तर सर्व फेरीवाल्यांनी संघटितपणे लढा दिलाच पाहिजे.
- रघुनाथ कांबळे : महापौरांचा आदेश मोडणाºया प्रशासनाचा निषेध. महापालिकेवर मोर्चा काढण्यात यावा.
- अशोक भंडारे : अतिक्रमण काढताना महापालिकेकडून अन्याय होत असेल, तर त्याला विरोध केलाच पाहिजे.
- सुरेश जरग : या अन्यायाविरोधात सर्वांनी संघटितपणे लढा द्यावा.
- प्र. द. गणपुले : फेरीवाल्यांचा दबाव निर्माण करणारा मोर्चा काढावा.
- मारुती भागोजी : कायदा व सुव्यवस्था यांची सांगड घालून प्रशासनावर दबाव निर्माण करावा.
- सोमनाथ घोडेराव : अन्यायाविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्याची गरज
- समीर नदाफ : निर्णायक लढा देणे आवश्यक आहे. त्याच्या निर्णयासाठी कोअर कमिटी स्थापन करावी.
मुद्द्यांवरून वादावादी
या बैठकीत भूमिका मांडताना सुरेश जरग आणि दिलीप पोवार, नंदकुमार वळंजू आणि समीर नदाफ यांच्यात वादावादी झाली. वारंवार हा प्रकार सुरू होता. यावर उपस्थितांपैकी काहींनी वादावादी थांबवा आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करा, असे सुनावले. अखेरीस आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्याचा निर्णय निमंत्रक पोवार यांनी जाहीर केल्यानंतर बैठक संपली.