...तर कोल्हापूरचे पाणी तोडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:07 AM2017-10-28T01:07:20+5:302017-10-28T01:10:45+5:30
कोल्हापूर : शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असूनही प्रभावी उपाययोजना तातडीने केली नाही, याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय हरित लवादाने महानगरपालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले,
कोल्हापूर : शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असूनही प्रभावी उपाययोजना तातडीने केली नाही, याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय हरित लवादाने महानगरपालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले, तर नदीतील पाणी प्रदूषित करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर पाटबंधारे विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस पाठवून पाणीपुरवठा खंडित करण्याचा, तसेच दंडनीय दराने पाणीपट्टी आकारण्याचा इशारा दिला.
शहरातील ८० एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असूनही तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. त्यातून कोल्हापूर महानगरपालिकेचा निष्काळजीपणा समोर आल्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद व पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दणका दिला. याप्रकरणी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन सर्व यंत्रणांचे लक्ष वेधले होते.
पुणे येथील राष्टÑीय हरित लवादासमोर नदीच्या प्रदूषणाबाबत सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्ते सुनील केंबळे यांनी ‘लोकमत’ची कात्रणे लवादासमोर सादर करून पंचगंगा प्रदूषणास महानगरपालिका कशी जबाबदार आहे, हे दाखवून दिले. लवादाचे न्यायाधीश यू. डी. साळवी व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नंदा यांनी या संदर्भात महानगरपालिकेने स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश दिला. पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होत असून, त्यावेळी हे स्पष्टीकरण देण्यात येईल, असे मनपाचे पर्यावरण अभियंता व्याघ्रांबरे यांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण
मंडळ, तसेच महानगरपालिकेला नोटीस दिली. कोल्हापूर शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रियेशियाय थेट पंचगंगा नदीत सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याबाबत पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगण्यात आले असून, महानगरपालिकेला दंडनीय दराने पाणीपट्टी आकारण्याचा, तसेच शहराचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
‘लोकमत’ इम्पॅक्ट
गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून शहरातील सर्वच्या सर्व मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असूनही महानगरपालिका यंत्रणा सुस्त असल्याबद्दल ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकून हा गंभीर विषय ऐरणीवर आणला. त्यानंतर जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी महानगरपालिकेस नोटीस दिली.
एवढेच नाही तर राष्टÑीय हरित लवादाने स्पष्टीकरण मागितले. तसेच पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. गेल्या ४५ दिवसांपासून निष्क्रिय वागणाºया मनपा प्रशासनास यामुळे चांगलाच दणका बसला आहे.
प्रदूषणाचा अखेर पंचनामा
गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शुक्रवारी पंचगंगा नदीचा पंचनामा करण्यात आला. प्रांताधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीने जयंती, दुधाळी नाला, राजाराम बंधारा, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा चार ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यासंबंधीचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला जाईल. -वृत्त/हॅलो १
प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर
पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. तुटलेली पाईपलाईन जोडून पूर्ववत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास का विलंब लावला जात आहे, अशी विचारणाही सदस्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप नेजदार होते. -वृत्त/हॅलो ३