लातूरसाठी आम्ही 'विमानानंही' पाणी आणू शकतो, भाजपा खासदार 'हवेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:43 PM2018-12-07T16:43:00+5:302018-12-07T16:44:06+5:30
भाजपा खासदार सुनिल गायकवाड यांनी लातूरमधील पाणीप्रश्नावर हवेत विधान केलं आहे.
लातूर - भाजपा खासदार सुनिल गायकवाड यांनी लातूरमधीलपाणीप्रश्नावर हवेत विधान केलं आहे. लातूरकरांच्या पाणीप्रश्नाबाबत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना 2016 मध्ये ट्रेनने लातूरला पाणी आणलं, आता आम्ही विमानानेही पाणी आणू शकतो. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचे हे विधान हवेत बोलल्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक विरोधकांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एखाद्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. 2016 साली मिरजहून रेल्वेद्वारे लातूरमध्ये पाणी आणण्यात आले. जिल्ह्यात टंचाई काळात पाणीस्त्रोत उपलब्ध नसल्याने थेट उजनीहून पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, बैठकावर बैठका आणि प्रस्तावांचा ढीग मंत्रालयात सादर करूनही ही योजना काही मार्गी लागली नाही. त्यामुळे लातूरमध्ये पुन्हा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असले तरी एप्रिल, मे महिन्यातील उन्हाळ्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न होणार असल्याचे दिसून येते.
सध्यातरी पाणीटंचाई नाही, पण मार्चनंतर पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ऊस उत्पादक गावात गरज भासल्यास टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे गायकवाड यांनी म्हटले. तसेच लातूर शहरात पाण्याचं नियोजन व्यवस्थीत झालं नाही. वेस्टेज ऑफ वॉटरमुळे शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी परीस्थितीमध्ये चारा अन् पिण्याचं पाणी हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच, 2016 मध्ये आम्ही ट्रेनने पाणी आणलं, आता विमानानेही आम्ही पाणी आणू शकतो. पण, त्याची गरज नाही, असे गायकवाड यांनी म्हटले. दरम्यान, खासदार सुनिल गायकवाड यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.