राज्यातील धरणांत अवघा ६१ टक्के पाणीसाठा ; पाणी नियोजनाचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 02:41 PM2018-10-27T14:41:56+5:302018-10-27T14:56:37+5:30

राज्य यंदा तीव्र जलसंकटाच्या छायेत असून, राज्यात अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा आहे. या साठ्यावरच पिण्यासाठी, शेती आणि उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान राज्य, जिल्हा आणि शहर प्रशासनावर असणार आहे.

61 percent water stock in dams of state ; Water Planning Challenge | राज्यातील धरणांत अवघा ६१ टक्के पाणीसाठा ; पाणी नियोजनाचे आव्हान 

राज्यातील धरणांत अवघा ६१ टक्के पाणीसाठा ; पाणी नियोजनाचे आव्हान 

ठळक मुद्देगेल्यावर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी पाणीसाठा कमी, मराठवाड्यावर जलसंकट पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ठिकाणची पिके वाया सुमारे दोनशे तालुके दुष्काळाच्या छायेत राज्यातील ३ हजार २६६ लहान मोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमतापुणे आणि कोकण प्रदेशात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगलीयंदा प्रशासनाला योग्य जलनीती राबवावी लागणार

पुणे : राज्य यंदा तीव्र जलसंकटाच्या छायेत असून, राज्यात अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा आहे. या साठ्यावरच पिण्यासाठी, शेती आणि उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान राज्य, जिल्हा आणि शहर प्रशासनावर असणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. मराठवाड्यात केवळ २३.७५ टक्के पाणीसाठा असल्याने येथील जल आवर्षणाचे संकट गडद बनले आहे.राज्यात सप्टेंबर महिन्यात जवळपास पाऊस बरसलाच नाही. परतीचा पाऊस देखील रुसला. परिणामी राज्यातील पाऊस नसलेल्या आणि पाऊस पडलेल्या भागातही दुष्काळी स्थिती आहे. पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ठिकाणची पिके वाया गेली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर, पाऊस सरासरीच्या जवळ अथवा अधिक असलेल्या भागात पावसात सातत्य नसल्याने तेथील पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळेच सुमारे दोनशे तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. राज्यातील ३ हजार २६६ लहान मोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असून, उपयुक्त पाणीसाठा ४० हजार ८२८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा २६ आॅक्टोबर अखेरीस धरणांमध्ये अवघा अवघा २४ हजार ८७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे.  
राज्यात पुणे आणि कोकण प्रदेशात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगली आहे. पुणे विभागाची १५ हजार २११ दशलक्ष घनमीटरची क्षमता असून, सध्या १२ हजार २१३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा (८०.२९ टक्के) आहे. गेल्यावर्षी याचकाळात ९४ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागाची ३ हजार ५१० दशलक्ष घनमीटर पाणीक्षमता आहे. सध्या ३ हजार १३ दशलक्ष घनमीटर (८५.८४ टक्के) पाणीसाठा असून, गेल्यावर्षी त्याची टक्केवारी ९४.२६ टक्के इतकी होती. मराठवाड्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७ हजार ३७४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १ हजार ७५१ दशलक्ष घनमीटर (३२.७५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण ७० टक्के होते. नाशिकची क्षमता ५ हजार ९३४ दशलक्ष घनमीटर असून, ३ हजार ७९९ (६४ टक्के), तर नागपूर विभागाच्या ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १ हजार ७४३ दशलक्ष घनमीटर (३७.८४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षी ८४.२८ आणि नागपूरमध्ये ४२.२१ टक्के पाणीसाठा होता. आॅक्टोबरमध्येच ही स्थिती असल्याने यंदा प्रशासनाला योग्य जलनीती राबवावी लागणार आहे. 

Web Title: 61 percent water stock in dams of state ; Water Planning Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.