राजस्थानपाठोपाठ आंध्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त; महाराष्ट्रात होणार काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:04 PM2018-09-11T12:04:43+5:302018-09-11T12:10:06+5:30
देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने काल (दि.10) भारत बंदची हाक दिली होती. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.
मुंबई : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने काल (दि.10) भारत बंदची हाक दिली होती. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या बंदाचा परिणाम होऊन राजस्थानपाठोपाठ आंध्रप्रदेशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्यासाठी पाऊले उचलण्यात आली. मात्र, महाराष्ट्रासह इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने इंधनांवरील करांमध्ये तूर्त कपात करण्याचे कुठलेही संकेत दिले नाहीत.
भारत बंदच्या आदल्या दिवशी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) 4 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेल अडीच रूपयांनी स्वस्त झाले. यानंतर सोमवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी सुद्धा इंधनांवरील कर कमी करण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला. त्यामुळे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून राज्यात इंधन 2 रूपयांनी स्वस्त झाल्याचे समजते.
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे देशासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फटका बसत आहे. इंधनाचे भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध पर्यायांवर विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सरकार सुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, आजच्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी 88.26 रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांमध्येही 15 पैशांची वाढ झाली आहे. डिझेलचा दर 77.47 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.