जेवण करून जा, पण पाणी नका मागू ! मराठवाड्यात पाणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 02:28 AM2019-04-30T02:28:38+5:302019-04-30T06:27:18+5:30
डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात
अंकुश वाघ
आडूळ (जि. औरंगाबाद) : डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला
केवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात. जेवण करून जा, पण पाणी नका मागू, असे सांगण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
आडूळ बुद्रुक मुख्य बाजारपेठेचे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पाच शासकीय टँकर सुरू आहेत. सार्वजनिक विहिरीत पाणी टाकले जाते आणि तब्बल २५ दिवसांआड नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वांना खासगी टँकरद्वारे दररोज ७० रुपये प्रति ड्रम व पाच रुपये प्रति हंडा दराप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका कुटुंबाला महिन्याकाठी फक्त पाण्यावर साधारण अडीच हजार रुपये लागतात. अनेक जण आठवडाभर विनाआंघोळीचे राहतात. आंघोळीचे पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते.
पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू असून ठेकेदाराला विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागत आहे. - शेख शमीम नासेर, सरपंच, आडूळ
खोडेगाव येथील डीएमआयसीचा पाणी पुरवठ्याचा पॉईंट सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल. - बळीराम कळमकर, ग्रामविकास अधिकारी, आडूळ
योजना रखडली
२०१८ मध्ये दोन कोटी नऊ लाख रुपयांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. या कामाचा कार्यारंभ आदेशसुद्धा निघाला आहे. परंतु प्रशासन व ठेकेदारामुळे ही योजना रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.