मोदी, शहा नको, कुणीही येऊ द्या : राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 03:49 PM2019-04-21T15:49:11+5:302019-04-21T18:38:52+5:30
मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता सर्वाधिक चर्चेत असलेले राज ठाकरे यांच्या सभा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच व्यक्ती देश चालवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.
राज ठाकरे यांच्या सभांमुळे निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. याबाबत राज ठाकरेंना माध्यमांनी विचारले असता, मला मोदी आणि अमित शहा नको मग याचा फायदा कुणलाही होऊ द्या असे त्यांनी सांगितले. मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
आपल्या ठाकरे शैलीत त्यांनी राज्यातील युतीचा सुद्धा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री आहे. भाजप-शिवसेना दोन्हीही पैशांसाठी आणि सत्तेसाठी लाचार आहेत. मी आधीच सांगितले होते युती होणार आहे. जर युती केली नसती तर शिवसेनेत उभी फूट पडली असती,असही राज यांनी सांगितले.
राज यांच्याकडून पुराव्यानिशी करण्यात येणारी टीका सत्ताधारी भाजपसाठी निवडणुकीच्या तोंडावर अडचणीची ठरत आहे. मात्र नरेंद्र मोदीं यांच्या विरोधात मनसेच्या इंजिनचा वेग वाढतच आहे. राज यांच्या टीकामुळे भाजपचे किती नुकसान होईल, हे पाहण्यासाठी निवडणूक निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे.