'सिंगर' म्हणून प्रज्ञा सिंह जेलमध्ये गेल्या होत्या का ? राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:10 PM2019-04-23T17:10:25+5:302019-04-23T17:39:25+5:30
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा सर्वनाश मी दिलेल्या शापानेच झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आली होती. जामीनावर सुटलेल्यांनी अशी वक्त करताना लाज बाळगावी अशी कडाडून टीका राज ठाकरे यांनी केली.
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आपल्याला जेलमध्ये असताना आपल्याला तत्कालीन अधिकारी हेमंत करकरे यांच्याकडून वाईट वागणूक मिळल्याचे आरोप भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. त्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. प्रज्ञा सिंह सिंगर म्हणून जेलमध्ये गेल्या नव्हत्या तर बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून गेल्या होत्या, याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा सर्वनाश मी दिलेल्या शापानेच झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आली होती. जामीनावर सुटलेल्यांनी अशी वक्त करताना लाज बाळगावी अशी कडाडून टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला कारागृहात जशी वागणूक दिली जाते, तशी वागणूक प्रज्ञा सिंहला मिळाली, त्यात वेगळ अस काय झालं, असा सवाल यावेळी राज यांनी उपस्थित केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रज्ञा सिंह हिचे समर्थन करतात हे दुर्दैवी आहे. बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपींच मोदी समर्थन करत असतील तर त्यांच्या मनात, देशाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांबद्दल काय आदर आहे हे उघड झालं असही राज म्हणाले.
प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रज्ञा सिंह यांचा समर्थन केले होते. प्रज्ञा सिंह जेलमध्ये असतांना त्यांना वाईट वागणूक देण्यात आली असे विधान पंतप्रधान नरेंद्र आणि अमित शहा यांनी केले होते.