तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 05:50 PM2019-10-10T17:50:47+5:302019-10-10T19:20:58+5:30
शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
तुळजापूर - विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील यांना विजयी करा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. यावेळी त्यांनी तुळजापूरला पर्यटन क्षेत्रात वैश्विक पातळीवर नेऊ, असं आश्वासन दिले. यावेळी मंत्री सुभाष देशमुख, तानाजी सावंत, सुजितसिंह ठाकूर उमेदवार राणा जगजितसिंह पाटील, राजा ओव्हाळ, दत्ता कुलकर्णी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह यांची प्रचारसभा तुळजापुरात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अमित शाह यांनी येथील दुष्काळ नष्ट करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. तसेच धनगर समाजाला 1000 कोटी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दुष्काळ दूर व्हावा यासाठी लागणाऱ्या 21 टीएमसी पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल. तसेच सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून काम करण्यात येईल, असंही शाह म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सुविधा देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असंही सांगितले.
यावेळी शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.