‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 09:12 AM2024-04-28T09:12:08+5:302024-04-28T09:13:17+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: नारायण राणेंच्या प्रचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते येणार आहेत. या दौऱ्यांवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Amit Shah, Yogi Adityanath should not fall into the trap of coming to Konkan, if they come here...', warns Bhaskar Jadhav | ‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरोधात भाजपाने ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. राणेंना दिलेल्या उमेदवारीमुळे दक्षिण कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालं असून, ठाकरे गट आणि राणेंमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. नारायण राणेंच्या प्रचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते येणार आहेत. या दौऱ्यांवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, इथे आल्यास येथील जनता त्यांना कोकणचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.

नारायण राणेंच्या प्रचारासाठी होणाऱ्या अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांवरून टोला लगावताना भास्कर जाधव म्हणाले की, खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. तरीही त्यांनी त्यांना पराभूत करून पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. आमचे विनायक राऊतही तसेच आहेत. मी आज अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात यायच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तरी विनायक राऊत आणि कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून विनायक राऊत यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांना पराभूत केले होते. आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र यावेळी विनायक राऊत यांच्यासमोर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आव्हान आहे.  

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Amit Shah, Yogi Adityanath should not fall into the trap of coming to Konkan, if they come here...', warns Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.