भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले युतीचे संकेत; समविचारी पक्षाला सोबत घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 06:04 PM2018-10-25T18:04:19+5:302018-10-25T18:04:55+5:30
समविचारी पक्षाला सोबत घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भाजपाची भूमिका आहे. शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. गत विधानसभेची निवडणूक सोडता २५ वर्षे आम्ही सोबत एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत.
चिखली : समविचारी पक्षाला सोबत घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भाजपाची भूमिका आहे. शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. गत विधानसभेची निवडणूक सोडता २५ वर्षे आम्ही सोबत एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी आमच्या सोबत यावे ही आमची इच्छा असली तरी शेवटी निर्णय ते घेतील, अशी भाजपा पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुलडाणा जिल्हयातील चिखली येथे गुरूवारी स्पष्ट केली.
चिखली येथील एका सत्काराच्या कार्यक्रमाला ते आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. शिवसेना सत्तेत राहून भाजपाला टार्गेट करते आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले की, शिवसेना व भाजपा दोन्ही वेगळे पक्ष आहे. प्रत्येक पक्षाचा अजेंडा वेगवेगळा असतो. कोणाला टार्गेट केल्याने पक्ष वाढतो असे जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे. भाजपा पक्ष हा आपल्या ठरलेल्या अजेंड्यानुसार चालतो. आम्ही कुठल्याही टिकेला विचलीत न होता संघटनात्मक काम करीत आहोत, असे दानवे म्हणाले. दरम्यान, शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणारी बोट उलटून झालेली दुर्घटना ही दुर्देवी असून त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही, असेही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.
दुसरीकडे टंचाईसदृश्य स्थितीतही दुष्काळी स्थितीत दिले जाणारे फायदे दिल्या जातील, असे ही दानवे यांनी अनुषंगीक विषयान्वये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सर्वसाधारणपणे राज्य शासनाच्या शब्दकोषामध्ये टंचाईसदृश्य असाच शब्द वापरल्या जातो. शरद पवार जे बोलले ते योग्यच बोलले. टंचाईसदृश्य स्थितीतही सामान्य जमीन महसूल माफी, परीक्षा शुल्क माफी, कर्ज वसूलीस स्थगिती सारख्या सवलती दिल्या जातील, असेही दानवे म्हणाले. दरम्यान, राज्यात मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यानुषंगाने तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुका नाही. त्याचाही समावेश दुष्काळी तालुक्यात व्हावा, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून चिखलीचा समावेश दुष्काळी तालुक्यात करावा, यासाठी विनंती करणार आहोत, असे ते म्हणाले.