बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:36 AM2018-08-29T11:36:45+5:302018-08-29T12:04:50+5:30

200 शेतकरी आणि 44 शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत करणार

amitabh bachchan to help to families of martyrs and farmers | बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य

बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य

Next

मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. याशिवाय त्यांनी देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे. अमिताभ बच्चन 200 कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. यासाठी अमिताभ दीड कोटी रुपये देणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जाच्या चक्रातून सुटका करण्यासाठी अमिताभ यांनी हे पाऊल उचललं आहे. मुंबईमध्ये केबीसीच्या 10 व्या पर्वाच्या लॉन्चिंगवेळी त्यांनी ही घोषणा केली.

शेतकऱ्यांसोबतच अमिताभ बच्चन शहीद जवानांच्या कुटुंबियांनादेखील भरीव मदत करणार आहेत. अमिताभ यांच्याकडून 44 शहीद जवानांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारकडून आम्हाला 44 शहीद जवानांच्या कुटुंबांची यांदी मिळाली आहे. त्यांच्यासाठी डिमांड ड्राफ्ट तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे, अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली. सरकारी व्यवस्थेनुसार या मदतीचं वाटप केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यानुसार, 60 टक्के मदतनिधी शहीद जवानाच्या पत्नीला आणि प्रत्येकी 20 टक्के मदतनिधी आई आणि वडिलांना दिला जाईल. याच व्यवस्थेनुसार आम्ही सध्या डिमांड ड्राफ्ट तयार करत आहोत, अशी माहिती अमिताभ यांनी दिली. 

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचून आपण अनेकदा व्यथित होतो, असंही अमिताभ म्हणाले. 'काही वर्षांपूर्वी मी विशाखापट्टणममध्ये चित्रीकरण करत होतो. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी 15 हजार, 20 हजार आणि 30 हजार रुपयांचं कर्ज फेडता न आल्यानं आत्महत्या केल्या होत्या. हे अतिशय वाईट होतं. त्यावेळी मी मुंबईला परतल्यावर 40 ते 50 शेतकऱ्यांना मदत केली होती. आता 200 शेतकऱ्यांना कर्जाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी दीड कोटी रुपयांची मदत करणार आहे,' असं अमिताभ यांनी सांगितलं. 
 

Web Title: amitabh bachchan to help to families of martyrs and farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.