यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग

By सीमा महांगडे | Published: May 6, 2024 09:38 AM2024-05-06T09:38:50+5:302024-05-06T09:40:05+5:30

भूमिगत गटारे, सेप्टीक टँक साफसफाई करताना कामगारांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

in mumbai no more victims of scavengers clean underground sewers by machine reinstructions of urban development department | यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग

यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग

सीमा महांगडे, मुंबई : भूमिगत गटारे, सेप्टीक टँक आदी बंदिस्त जागेत साफसफाई करताना कामगारांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शीघ्र कृती दलही स्थापन करण्यात आली आहेत. तरीही मुंबईसह राज्यात अशा घटना वारंवार घडत आहेत.   

त्यामुळे सफाईची अशी कामे करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुन्हा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात बंदिस्त जागांची साफसफाई प्राधान्याने यांत्रिक पद्धतीने किंवा मशीनद्वारे करावी, असे स्पष्ट केले आहे.

मुंबईत मागील दोन महिन्यांत सेप्टीक टँकमध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे सेप्टीक टँक आणि मलनिस्सारण वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदारांना जबाबदारी देताना पालिकेकडून होणाऱ्या हलगर्जीवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. 

अशा घटना टाळण्यासाठी नगर विकास विभागाने पुन्हा या संदर्भातील सूचना जारी केल्या असून, त्यात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 

अशा आहेत सूचना...

१) फक्त अपरिहार्य परिस्थितीतच सफाई कामगारांमार्फत सेप्टीक टँक किंवा भूमिगत गटारात उतरून साफसफाई करावी.

२) बंदिस्त जागांची कामगारांमार्फत सफाई करण्यापूर्वी त्या जागेची खोली मोजावी. जागेबाबतचा तपशील समजून दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय अंमलात आणावेत.

३) बंदिस्त जागांची हवा ही विषारी व ज्वालाग्राही वायू, धूळ यापासून मुक्त असल्याबाबत तसेच तेथे ऑक्सिजनयुक्त हवेची कमतरता नसल्याबाबत तपासणी करावी.

४) या कामाचे कामगारांना प्रशिक्षण द्यावे. प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या कामगारांनाच सेप्टीक टँक, भूमिगत गटारे यामध्ये काम करण्यास परवानगी द्यावी.

५) ताज्या हवेच्या पुरेशा पुरवठ्याची खातरजमा करण्यासाठी यांत्रिक वायुविजनाची सुविधा उपलब्ध करावी. 

६) बंदिस्त जागेत थेट ऑक्सिजनमुळे आग किंवा स्फोटाचा धोका वाढत असल्याने, थेट ऑक्सिजनचा वापर करू नये.

७) काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेबाबतची सर्व खबरदारी घेतल्याचा सुरक्षितता परवाना साइट मॅनेजरने देणे आवश्यक आहे.

८)  सुरक्षित गणवेश, सुरक्षित चष्मा परिधान करावा. सुयोग्य श्वासोच्छवास उपकरण सोबत ठेवावे. आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास कामगारास ओढून बाहेर काढता येईल, अशा पुरेशा मजबूत दोरखंडास सुरक्षितपणे जोडलेला पट्टा असणे आवश्यक आहे.

९) कामगार नुकसानभरपाई अधिनियम, १९२३ मधील तरतुदीनुसार त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने, मानव अधिकार आयोग यांच्या सूचनेनुसार मृत अथवा जखमी कामगारास देय असणारी भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित प्रमुख कंत्राटदाराची असेल.

वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचना केव्हा?

१) मागील दोन महिन्यांत मुंबईत सेप्टीक टँकमध्ये पडून कामगारांचा मृत्यू झाल्याच्या तीन घटना घडल्यानंतर आतातरी पालिकेकडून कार्यवाही होणार का? प्रत्येक वॉर्डातील सेप्टीक टँक आणि छोट्या मलनिस्सारण वाहिन्यांची जबाबदारी वॉर्ड अधिकाऱ्यांची असून, त्यांना याबाबतच्या सूचना कधी देणार आणि जबाबदाऱ्या केव्हा निश्चित होणार, असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

Web Title: in mumbai no more victims of scavengers clean underground sewers by machine reinstructions of urban development department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.