झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित
By सचिन लुंगसे | Published: May 16, 2024 07:46 AM2024-05-16T07:46:23+5:302024-05-16T07:47:31+5:30
मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत.
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अल्पसंख्याक मतदारांचा प्रभाव असणाऱ्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांच्यातील चुरस दिवसागणिक वाढतच असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारसंघात रंगत आली आहे. विशेषत: चांदीवली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मतदारसंघातील राजकीय चित्र किंचित पलटण्यास सुरुवात झाली असली तरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याची उत्सुकता आहे.
मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात फलित मात्र काहीच हाती आलेले नाही. आता प्रचारात ॲड. उज्ज्वल निकम आणि प्रा. वर्षा गायकवाड यांच्या दोघांच्याही भाषणांत झोपड्यांचा पुनर्विकास, संरक्षण जमिनीवरील झोपड्या, नदी-नाले साफसफाईसारखे मुद्दे प्राधान्याने येत असले तरी चर्चेचे गुऱ्हाळ संपून हे प्रश्न मार्गी लागतील अशी खात्री मतदारांना वाटत नसल्याचे दिसते.
महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीकडून प्रचार केला जाताना स्थानिक विकासाच्या मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुद्द्यांचा देखील आधार घेतला जात आहे. सध्या येथील प्रचार शिगेला पोहोचला असून कोणाचे मुद्दे अपील होणार आणि विशेषत: अल्पसंख्यांक मतदारांचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार, हे निकालातूनच दिसेल.
गटा-तटाचा काय परिणाम होणार?
काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी मंत्री नसीम खान नाराज झाले होते. पक्षाने खान यांची नाराजी दूर केली असली तरी या काळात त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी चांदीवली येथील सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो.
२०१९ मध्ये काय घडले?
उमेदवार पक्ष प्राप्त मते
पूनम महाजन भाजप ४,८६,६७२
प्रिया दत्त काँग्रेस ३,५६,६६७
नोटा - १०,६६९
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
२०१४ पूनम महाजन भाजप ४,७८,५३५ ५६.६१
२००९ प्रिया दत्त काँग्रेस ३,१९,३५२ ४८.०५
२००४ एकनाथ गायकवाड काँग्रेस २,५६,२८२ ४९.८०
१९९९ मनोहर जोशी शिवसेना २,९४,९३५ ५५.८३
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
एलबीएसवरील वाहतूककोंडी आणि अरुंद रस्ते हा प्रमुख मुद्दा आहे. दरडीवरील झोपड्यांचे पुनर्वसन कित्येक वर्षांपासून रखडले आहे. झोपड्यांचा पुनर्विकास, फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.