इंधन दरवाढ सुरुच! पेट्रोल शतकापासून 10 रुपये दूर; तर डिझेलची 80 रुपयांच्या दिशेनं कूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 07:15 AM2018-09-23T07:15:32+5:302018-09-23T07:22:09+5:30
आज मुंबईत पेट्रोल 17, तर डिझेल 11 पैशांनी महागलं
मुंबई: देशभरात आजही इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 89.97 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मात्र आज डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर 78.53 रुपयांवर गेला आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्यानं सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडला आहे.
काल मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 89.80 रुपये मोजावे लागत होते. आज त्यात 17 पैशांची भर पडली आहे. याशिवाय डिझेलचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची भावना आहे. मुंबईकरांसोबतच दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतदेखील पेट्रोलचा दर 17 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलसाठी 82.61 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीत डिझेलचा दर 73.97 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये डिझेलचे दर वाढलेले नव्हते. मात्र आता त्यातही वाढ झाल्यानं भाजीपाल्यासह अन्य वस्तूंचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. याविरोधात 10 सप्टेंबरला काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली होती. या बंदला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत देशवासीयांना इंधन दरवाढीमुळे होणाऱ्या त्रासाची सरकारला कल्पना असल्याचं म्हटलं होतं. मात्र इंधनाच्या दरात कपात करण्यास त्यांनी असमर्थतता दर्शवली. इंधनाचे दर सरकारच्या आमच्या हातात नाहीत, असं म्हणत त्यांनी हात वर केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्यानं सरकारला दर वाढवावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.