हेच ते अच्छे दिन; पेट्रोल, डिझेल दरवाढीवरुन शिवसेनेचा पोस्टर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 12:04 PM2018-09-09T12:04:48+5:302018-09-09T12:06:37+5:30
पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
मुंबई: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोलचे दर नव्वदीकडे वाटचाल करू लागले आहेत. 'बहुत हुई महंगाई की मार', 'अच्छे दिन आनेवाले है', अशा घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर चढेच राहिल्यानं सर्वसामान्य त्रस्त आहेत. यावरुन भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हेच ते अच्छे दिन, असा मजकूर असलेले पोस्टर शिवसेना भवन परिसरात लावण्यात आले आहेत.
शिवसेना भवन परिसरात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये 2015 आणि 2018 मधील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांचे आकडे देण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गेल्या तीन वर्षांमध्ये किती वाढले, हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. हेच ते अच्छे दिन, असा उपरोधिक टोलादेखील शिवसेनेनं लगावला आहे. शनिवारी काँग्रेसनंदेखील घसरता रुपया, राफेल डील आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरुन भाजपावर निशाणा साधला. भाजपा म्हणजे बहुत झुठी पार्टी असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
आजदेखील मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर 12 पैशांनी, तर डिझेलचे दर 11 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी मुंबईत 87.89 रुपये तर डिझेलसाठी 77.09 रुपये मोजावे लागत आहेत. मागील महिन्याभरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी, तर डिझलेच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.