तुझ्या मेव्हुणीला २ दिवसात पळवणार! प्रेयसीच्या जिजूला प्रेमवीराचे चॅलेंज

By नरेश डोंगरे | Published: April 26, 2024 09:07 PM2024-04-26T21:07:02+5:302024-04-26T21:07:22+5:30

छत्तीसगडमधील 'चेन्नई एक्सप्रेस' नागपुरात अडकली

nagpur railway police arrest minor couple ran away from house at chhattisgarh | तुझ्या मेव्हुणीला २ दिवसात पळवणार! प्रेयसीच्या जिजूला प्रेमवीराचे चॅलेंज

तुझ्या मेव्हुणीला २ दिवसात पळवणार! प्रेयसीच्या जिजूला प्रेमवीराचे चॅलेंज

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : तुम मुझे हलके मे मत लो... दो दिन मे तुम्हारी साली को भगाकर ले जाऊंगा, असे आव्हान एका युवकाने गावातील तरुणाला दिले. बच्चा है, बकवास कर रहा होंगा, असे समजून त्या व्यक्तीने या युवकाला गांभिर्याने घेतले नाही. मात्र, दोन दिवसांनंतर मेव्हणी घरून गायब झाल्यामुळे जिजू आणि त्याचे कुटुंबिय हादरले. ते अल्पवयीन मुलीचा शोध घेत असतानाच छत्तीसगडहून नागपूरला आलेल्या एका रेल्वेगाडीत ती मुलगी आणि तिचा प्रियकर रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती लागले. त्यानंतर फिल्मी वाटावी, अशी एक कहानी पुढे आली.

या घटनेतील युवक २० वर्षांचा आहे. तो छत्तीसगडमधील जांजगीर चांपा जिल्ह्यात राहतो. त्याच्या गावाशेजारीच्या गावात ही युवती (वय १६) राहते. दोन-तीन महिन्यांपूर्वी एका जत्रेत त्या दोघांची ओळख झाली. पहिल्याच नजरेत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. निरंतर संपर्कात राहता यावे म्हणून त्याने तिला एक मोबाईल घेऊन दिला. तेव्हापासून ते रात्रंदिवस एकमेकांशी गुजगोष्टी करू लागले. दोन दिवसांपूर्वी युवतीच्या बहिणीच्या नवऱ्याला (जिजाजीला) त्याची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने युवकाला भेटून समज देण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकाने हिरोगिरी करत फिल्मी स्टाईलने प्रेयसीच्या जिजूशी वाद घातला. 'तुम मुझे हलके मे मत लो. दोन दिन मे तुम्हारी साली को भगाकर ले जाऊंगा' असे चॅलेंजपूर्ण वक्तव्य केले. जेमतेम मिसुरडे फुटलेला हा युवक तावातावाने बोलत असावा,असा अंदाज काढून जिजूने फारसे मनावर घेतले नाही. मात्र, गुरुवारी दुपारपासून साळी बेपत्ता झाल्याने जिजू, त्याची पत्नी आणि सासरची मंडळी हादरली. त्यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी आजूबाजूंची गावे, शेतशिवार पालथी घातली. ईकडे गावातून सटकलेला युवक त्याच्या प्रियसीला घेऊन बिकानेर एक्सप्रेसने माैजमजा करण्यासाठी नागपूरकडे निघाला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विविध मार्गावरील रेल्वे गाड्यात आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात विशेष प्रवासी सुरक्षा अभियान चालविण्यात येत आहे. बिकानेर एक्सप्रेसमध्ये हे अभियान चालविणारे एएसआय के. के. निकोडे, प्रधान आरक्षक एम. एस. झारीया, आरक्षक सुनिल एस. नेहा, प्रदीप कुमार आणि पी. के. मिश्रा यांच्या नजरेस आज पहाटे हे प्रेमी युगूल पडले. त्यांनी चाैकशी करताच ते दोघे घरून पळून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ही बाब सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांना कळवून नंतर या दोघांना नागपूर स्थानकावर उतरवून कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांनी या दोघांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना कळविले. आज सायंकाळी दोघांचेही नातेवाईक रेल्वे पोलिसांकडे पोहचले.

हिरोगिरी करणाराने काढल्या उठाबश्या

प्रियसीच्या जिजूला दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठीच प्रियसीला आपण पळवून आणले. तिला परत सुखरूप गावात घेऊन जाणार होतो, अशी माहिती देऊन हिरोगिरी करणारा युवक दोन्हीकडच्या नातेवाईकांसमोर क्षमायाचना करू लागला. पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून त्याने चक्क पोलीस ठाण्यातच उठाबशाही काढल्या. त्याचे वय आणि भविष्याचा विचार करून मुलींकडील मंडळींनी कोणतीही तक्रार करण्याचे टाळले. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा 'असे कृत्य' न करण्याची ताकिद देऊन सोडून दिले.

 

Web Title: nagpur railway police arrest minor couple ran away from house at chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.