‘फूटपाथ’वर भरणारी शाळा; ‘मॉडर्न’ युगाचे संवेदनशील शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:34 AM2018-09-05T11:34:30+5:302018-09-05T11:34:55+5:30
वर्गखोल्यांमध्ये भरणाऱ्या शाळेचा अनुभव साचेबद्ध असतो. मात्र शिक्षणाचा गंधही नसलेल्या मुलांसोबत ‘फूटपाथ’वर शाळा चालविताना मिळणारा अनुभव हा कुठल्याही पुस्तकातील ज्ञानापेक्षा निश्चितच वेगळा ठरतो.
अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्गखोल्यांमध्ये भरणाऱ्या शाळेचा अनुभव साचेबद्ध असतो. मात्र शिक्षणाचा गंधही नसलेल्या मुलांसोबत ‘फूटपाथ’वर शाळा चालविताना मिळणारा अनुभव हा कुठल्याही पुस्तकातील ज्ञानापेक्षा निश्चितच वेगळा ठरतो. विद्यापीठ ग्रंथालयाकडून महाराज बागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर सायंकाळी अशीच एक शाळा भरते. आपले दोन शिक्षक कधी येतात याची लहान मुले प्रतीक्षा करत असतात अन् शिक्षक दिसले की त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. विशेष म्हणजे हे शिक्षक म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य तरुणाईचे प्रतिनिधी असून ‘मॉडर्न’ युगातदेखील संवेदनशीलता जपल्याने ते या समाजकार्याकडे वळले.
तसे पाहिले तर ‘उपाय’ (अंडर प्रिव्हिलेज्ड अॅडव्हान्समेन्ट बाय युथ) ही स्वयंसेवी संस्था नागपूरसाठी नवीन नाही. वरुण श्रीवास्तव यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे नागपुरात ११ केंद्र चालतात. वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिकविण्यात या संस्थेचा मौलिक वाटा आहे. महाराज बागजवळील ‘फूटपाथ’ शाळेत ‘लोकमत’ने भेट देऊन एक सायंकाळ घालविली असता एक वेगळाच अनुभव मिळाला. शिक्षक आल्यानंतर विद्यार्थी फूटपाथवर उभे राहून ‘नमस्ते’ म्हणतात. काही विद्यार्थी चक्क इंग्रजीत ‘गुड इव्हिनिंग’ने स्वागत करतात तर काही पाया पडून आशीर्वाद घेतात. किरण कलंत्री व दिव्या बेलेकर या दररोज येथे मुलांना शिकवायला येतात.
किरण कलंत्री या स्वत: शिक्षिका आहेत. त्यामुळे शिकविण्याचे कौशल्य त्यांच्यात आहेत. मात्र या मुलांना शिकविताना मला दररोज नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. दिव्या बेलेकर ही विज्ञान पदवी अभ्यासक्रमाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी काही दिवसांअगोदरच संस्थेशी जुळली आहेत. या मुलांशी फार कमी कालावधीत आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे, असे तिने सांगितले.
स्पर्धांचेदेखील आयोजन
या अनोख्या शाळेत मुलांना अभ्यासासोबतच स्पर्धांच्या माध्यमातून विविध खेळांचेदेखील ज्ञान देण्यात येते. यात जम्पिंग रेस, कराटे यांचा समावेश आहे. या मुलांना शिक्षिकांनी पेपर बॅग्सदेखील बनविण्यास शिकविले आहे. तर मुलांनी त्याना पेपरपासून टोपी बनविणे शिकविले.