अमित शाहांनी भाजपा नेत्यांना दिला उत्तर प्रदेशात 74+ जागा जिंकण्याचा मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 07:32 AM2018-08-13T07:32:17+5:302018-08-13T07:43:14+5:30
2019च्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, त्याप्रमाणेच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
लखनऊः 2019च्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, त्याप्रमाणेच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्षअमित शाह काल उत्तर प्रदेशमध्ये आले होते. भाजपाच्याउत्तर प्रदेशातील कार्यसमितीच्या बैठकीत अमित शाहांनी कार्यकर्त्यांना 74+ जागा जिंकण्याचा मंत्र दिला आहे. उत्तर प्रदेशातील नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं होतं.
ते म्हणाले, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 74+ जागा जिंकून भाजपा नव्या विजयाची नोंद करणार आहे. तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अपना दलाबरोबर युती करत उत्तर प्रदेशमध्ये 73 जागा जिंकल्या होत्या. अमित शाह यांनी महागठबंधनाशी दोन हात करण्याची जबाबदारी भाजपाच्या नेत्यांवर सोडली आहे. महागठबंधन हे भाजपासाठी आव्हान नाही. तुम्ही फक्त मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारच्या योजना घराघरात घेऊन जा. तुम्ही गल्लीबोळातील लोकांच्या घरी जाऊन या योजनांबद्दल जनजागृती करा, तुम्ही डोंगरासारखे उभे राहिलात, तर भाजपाचा विजय निश्चित आहे, असंही अमित शाह कार्यकर्त्यांना संबोधून म्हणाले आहेत.
(देशात मुदतीआधी लोकसभा निवडणूक होणार नाही- अमित शहा)
(बांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची व्होटबँक; ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शहा यांची जोरदार टीका)
भाजपा मतांच्या ध्रुवीकरणाचं नव्हे, तर विकासाचं राजकारण करणार आहे. पुढची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल. त्याच दरम्यान त्यांनी लोकसभेच्या 74+ जागा जिंकण्याचा मानस बोलून दाखवला. लोक म्हणतात, सपा-बसपा एकत्र आले आहेत, तर भाजपाचं काय होईल ?, त्याला प्रत्युत्तर देताना अमित शाह म्हणाले, उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि काँग्रेससह सर्वांना आम्ही एकदा पराभवाची धूळ चारली आहे. जेव्हा 2017ची निवडणूक लढलो होतो, तेव्हा दोन मुलांनी हातमिळवणी केली होती. त्याच वेळी आम्ही उत्तर प्रदेशात 300हून अधिक विधानसभेच्या जागा जिंकलो. यावेळीसुद्धा तिघांनीही आघाडी केली तरी आम्ही लोकसभेच्या 74 जाग जिंकूच, असंही विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला आहे.