गुरूग्राममधील शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला ७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 01:42 PM2017-09-08T13:42:05+5:302017-09-08T17:15:49+5:30
गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या एका ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.
गुरगाव, दि. 8- गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या एका ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहितीही समोर येते आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघड झाली. सात वर्षाच्या मुलाचा धारधार शस्त्राने गळा कापण्यात आल्याचं समजतं आहे. स्वच्छतागृहात त्या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तसंच मृतदेहाच्या शेजारी चाकू सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. तसंच शाळेच्या बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते आहे.
Gurugram: Body of a class II student found inside a toilet in Ryan International School, Bhondsi.
— ANI (@ANI) September 8, 2017
गुरुग्राममधील भोंडसी परिसरातील सोहना मार्गावर रेयान इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. प्रद्युमण असं मृत्यू झालेल्या या मुलाचं नाव आहे. त्याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास प्रद्युमण शाळेत आला होता. अर्ध्या तासाने म्हणजेच पावणे नऊच्या सुमारास त्याची हत्या झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने त्याच्या पालकांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांचं एक पथक सध्या शाळेत असून या प्रकरणी विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे.
प्रद्युमण हा त्याच्या आई-वडिलांसह सोहनामधील मारूती कुंज भागात राहत होता. प्रद्युमणचं कुटुंबीय मुळचं बिहारचं असल्याचं समजचं आहे. रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील अशोक नावाच्या माळीने पहिल्यांदा स्वच्छतागृहात मुलाचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने शाळा प्रशासनाला याबद्दल माहिती दिली होती. मुलाची हत्या करून हल्लेखोर खिडकीतून पळाले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जातो आहे.