दलित मतांसाठी भाजपाची खेळी; अमित शहांच्या रॅलीमध्ये शिजणार 3,000 किलो खिचडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:58 PM2019-01-01T19:58:15+5:302019-01-01T20:12:07+5:30
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दलित समाजासोबत संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि विश्वविक्रम रचण्यासाठी भाजपाकडून जवळपास 3,000 किलोग्रॅम खिचडी बनवण्यात येणार आहे. रविवारी नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या भाजपाच्या रॅलीदरम्यान खिचडी बनवण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे खिचडीसाठी लागणारे तांदुळ आणि डाळ ही जवळपास तीन लाख दलितांच्या घरातून जमा करण्यात येणार आहे. रामलीला मैदानावर होणाऱ्या भीम महासंगम रॅलीमध्ये ही खिचडी शिजवण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सभेला संबोधित करणार आहेत.
दिल्लीतील भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मोहनलाल गिहारा यांनी सांगितले की,''आम्ही आतापर्यंत दोन लाख दलित घरांतून अन्नधान्य गोळा केले आहे. येत्या काही दिवसांत आम्ही तीन लाख घरांचे लक्ष्य पूर्ण करणार आहोत. शिवाय, या कामगिरीची विश्वविक्रम म्हणून नोंद व्हावी, यासाठी गिनीज बुककडे संपर्क साधणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी 918.8 किलोग्रॅम खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी वेगवेगळे जिन्नस वापरून 3000 किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली होती.
''भाजपा फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा चालवत नाहीत!'' https://t.co/gLTVeoQvmS@narendramodi@PMOIndia#BJP@AmitShah
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 1, 2019
सलग 53 तास नॉनस्टॉप कुकींगचा विश्वविक्रम करणारे शेफ विष्णू मनोहर यांनी घराघरात आणि गरीबांच्या ताटातील खिचडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न याद्वारे केला. जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी नागपुरातील चिटणीस पार्कमध्ये 3000 किलोची खिचडी तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातून खास प्रकारची कढई मागवली होती. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी 11 फुटांचा सराटा वापरला. लाकडाच्या इंधनाचा वापर करून त्यांनी स्वादिष्ट खिचडी तयार केली.
पाच राज्यांमधील पराभवावर मोदी पहिल्यांदाच बोलले; बघा काय म्हणाले... https://t.co/CZ5WTulWiv#assemblyelections2018results@narendramodi@RahulGandhi
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 1, 2019