गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात, संघाच्या सर्व्हेमधून आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 07:41 PM2017-09-27T19:41:03+5:302017-09-27T22:44:47+5:30
भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये या पक्षाला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे....
अहमदाबाद - भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये या पक्षाला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता येथील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना भाजपासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१७ च्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसू शकतो, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्व्हेमधून मिळाली आहे. आरएसएसने केलेल्या एका सर्व्हेनुसार गुजरात विधानसभेमध्ये भाजपाला 182 पैकी फक्त 60 ते 65 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर काँग्रेसला 100 जागा मिळतील. गुजरातनंतर 2018 मध्ये होणाऱ्या मध्यप्रदेशमधील निवडणुकीतही भाजपाला 57 ते 60 जागांवर समाधान मानवं लागेल. आरएसएसच्या या सर्व्हेत नमूद अंदाज खरा ठरल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीला हा मोठ्ठा धक्का असू शकतो.
आरएसएसच्या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी 8 ते 10 टक्क्यांनी घसरली आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेसने 183 जागांपैकी 113 जागांवर विजय मिळवत भाजपाचा पराभव केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 20 आमदार पाच हजारपेक्षा कमी मतांनी निवडून आले होते. गेली वर्ष भाजपा गुजपातमध्ये सत्तेत आहे. आरएसएसच्या सर्वेनुसार या विधानसभा निवडणुकीत मतदार आपला 20 वर्षांचा उद्रेक मतांच्या पेटीतून बाहेर काढू शकतात. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सुरू असलेल्या पाटीदार आणि दलित आंदोलनामुळे भाजपाला कमीतकमी 18 जागांवर परभवाचा सामना करावा लागू शकतो.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकींच्या दृष्टीने भाजपाने गेल्या वर्षीपासून तयारी केली केली आहे. मागील सहा महिन्यात नरेंद्र मोदींचे गुजरातचे दौरे वाढले आहेत. राज्याच्या वेगवेगळय़ा भागात जाऊन सभा घेणं, लोकांना भेटणं त्यांनी सुरू केलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे कार्यकर्ते उत्साहात आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. अनेक वर्षे राज्यात भाजपाची सत्ता असली तरी लोकांच्या वाटय़ाला अद्याप अच्छे दिन आलेले नाहीत, देशभरात चर्चा होणा-या विकासाच्या गुजरात मॉडेलनी लोकांच्या जीवनात अच्छे दिन आणलेले नाहीत. सामान्य माणसांच्या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. आणि म्हणून प्रामुख्याने शेतकरी असलेला पटेल समाज भाजपाच्या राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे.