#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 06:13 AM2018-10-14T06:13:49+5:302018-10-14T06:18:19+5:30

माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे.

#MeToo Action take only after investigating the facts on Akbar: Amit Shah | #MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा

#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा

Next

नवी दिल्ली : माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही दखल घेतली आहे. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल, असे अमित शहा यांनी शनिवारी स्पष्ट केले.


आतापर्यंत सात भारतीय व एक परदेशी अशा आठ महिला पत्रकारांनी एम. जे. अकबर यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्याबाबतच्या प्रश्नावर शहा म्हणाले की, आरोपांची चौकशी नक्की केली जाईल. आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे पाहणे आधी आवश्यक आहे.


अकबर यांना संरक्षण देता कामा नये, असा दबाव भाजपा नेतृत्वावर आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अकबर यांच्यावर कारवाई न केल्यास काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आपल्यावर तुटून
पडतील आणि आपल्याविरोधात वातावरण तयार करतील, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.


या निवडणुका भाजपासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. तिथे आपल्याविरुद्ध जनमत तयार झाले, तर पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल. शिवाय एकाच व्यक्तीवर आठ जण जेव्हा लैंगिक शोषणाचा आरोप करतात, त्यात निश्चित तथ्य असेलच. त्यामुळे अकबर यांना घरी बसवणे सोयीचे ठरेल, असा मतप्रवाह भाजपामध्ये आहे.


रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. मनेका गांधी व स्मृती इराणी या महिला केंद्रीय मंत्र्यांनी आधीच ती मागणी केली आहे. अकबर उद्या, रविवारी गयानाहून भारतात परतणार आहेत. ते आधी नायजेरियाला गेले होते. तेथूनच त्यांना परत भारतात बोलवावे, असे काही केंद्रीय मंत्र्यांचे म्हणणे होते. पण अकबर तेथून गयाना येथे गेले. ते आल्यावर उद्या वा सोमवारी त्यांच्याबाबत निर्णय होईल, असे दिसते.

Web Title: #MeToo Action take only after investigating the facts on Akbar: Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.