48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 09:23 AM2018-09-04T09:23:25+5:302018-09-04T09:25:27+5:30
इंधन दरवाढीवरुन स्वामींची मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. यावरुन आता भाजपाचे राज्यसभेतील सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पेट्रोलचे दर जास्तीत जास्त 48 रुपये प्रति लिटर असायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे लोकांकडून वसूल करत असेल, तर ते शोषण आहे, असं स्वामी यांनी म्हटलं.
आज मुंबईत पेट्रोलचा दर 86.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे आता भाजीपाल्यासह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. पेट्रोलचे दर 48 रुपयांपेक्षा अधिक वाढवले जाऊ नयेत. सरकार यापेक्षा जास्त किंमत जनतेकडून वसूल करत असेल, तर ती सर्वसामान्यांची लूट आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी यांनी इंधन दरवाढीवरुन सरकारचा समाचार घेतला.
पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. राज्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीत सोमवारी (3 सप्टेंबर) रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर दर 87.97 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.09 होता. त्यानंतर आज त्यामध्ये वाढ होऊन पेट्रोलचा प्रतिलिटर दर 88.14 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.29 झाला आहे. सलग 10 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनानं होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल 68 रुपये प्रति लिटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल 74 रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितलं आहे.