न्यायमूर्ती जोसेफ यांनी घेतली तिसऱ्या क्रमांकावरच शपथ, अन्य दाेन न्यायाधीश शपथबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 01:55 PM2018-08-07T13:55:49+5:302018-08-07T13:58:26+5:30
केंद्र सरकारने न्या. जोसेफ यांची सेवाज्येष्ठता घटविल्याने वाद निर्माण झाला होता.
नवी दिल्ली : न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या सेवाज्येष्ठतेवरून उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तीन न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती जोसोफ यांच्यासह न्या. विनीत सरन आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांनी ही शपथ घेतली.
केंद्र सरकारने न्या. जोसेफ यांची सेवाज्येष्ठता घटविल्याने वाद निर्माण झाला होता. जोसेफ यांना यादीमध्ये तिसरे स्थान देण्यात आल्याने नाराज झालेल्या न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर केंद्र सरकारने क्रमानुसारच शपथिवधी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
The govt has given the message that if a judge doesn't make a judgement in their favour, he may be treated the same. I believe that this day will be seen as a 'black day' in the history of Indian judiciary. This is the arrogance of the govt: Kapil Sibal on Justice KM Joseph pic.twitter.com/jENtmk9J9G
— ANI (@ANI) August 7, 2018
मंगळवारी प्रथम न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी शपथ घेतली. न्या. विनीत सरन यांच्यानंतर न्या. जोसेफ यांनी शपथ घेतली.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी हा सरकारचा अहंकार असल्याची टीका केली. भारतीय न्यायपालिकेने आज काळा दिवस अनुभवला. सरकारविरोधात निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना असेच अपमान सहन करावे लागतील, असा आरोप त्यांनी केला.
न्या. जोसेफ यांची सेवाज्येष्ठता कमी केल्याचा परिणाम त्यांच्या सरन्यायाधीश बनण्यावर आणि कोणत्याही खंडपीठाची अध्यक्षता भूषविण्यावर होणार आहे.