कुरिअरने घरी पाठवले दोनशे विद्यार्थ्यांचे दाखले : पालक हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:57 PM2019-03-21T17:57:08+5:302019-03-21T18:14:48+5:30

अ‍ॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्कवाढीला पालकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे.

200 students certificate sent home by Courier | कुरिअरने घरी पाठवले दोनशे विद्यार्थ्यांचे दाखले : पालक हवालदिल

कुरिअरने घरी पाठवले दोनशे विद्यार्थ्यांचे दाखले : पालक हवालदिल

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅमेनोरा स्कूलविरोधात पालकांचे आंदोलन या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ६५ हजार रूपयांवरून ८५ हजार अ‍ॅमेनोरा स्कूलच्या या शुल्कवाढी संदर्भात १५ दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांच्या दालनात बैठक विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी कोणतीही कृती शाळेने करू नये असे स्पष्ट निर्देश

पुणे : हडपसर येथील अ‍ॅमेनोरा स्कूलने शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर दोनशे विद्यार्थ्यांचे दाखले कुरिअरने त्यांच्या घरी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याविरोधात पालकांनी गुरूवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले. शाळेने याबाबत तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा पालकांकडून देण्यात आला आहे.
अ‍ॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्कवाढीला पालकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. शाळेने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ६५ हजार रूपयांवरून ८५ हजार इतके केले होते. शुल्कवाढ करताना नियमानुसार पालक शिक्षक संघाची मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे ही शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने भरण्यास पालकांकडून नकार देण्यात आला होता. मात्र शाळा प्रशासन शुल्कवाढ करण्यावर ठाम होते.
शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर अचानक अ‍ॅमेनोरा शाळा प्रशासनाने दोनशे पालकांच्या त्यांच्या पाल्यास शाळेतून काढून टाकल्याचे स्पष्ट करून त्यांचे दाखले घरपोच पाठवून दिले. यामुळे पालकांना मोठा धक्का बसला. गुरूवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी शाळेसमोर एकत्र येऊन या शुल्कवाढीचा तीव्र निषेध केला.
शिवसेनेचे शहर समन्वयक आनंद दवे यांनी सांगितले, अ‍ॅमेनोरा शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले कुरिअरने घरी पाठविल्याच्या प्रकरणाची शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने शाळेविरूध्द कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. ही कारवाई न झाल्यास पालकांकडून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.  
अ‍ॅमेनोरा स्कूलच्या या शुल्कवाढी संदर्भात १५ दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली होती. या बैठकीला शाळा व्यवस्थापन, पालक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल अशी कुठलीही कृती शाळा व्यवस्थापनाने करू नये अशा स्पष्ट सुचना त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही त्याला न जुमानता शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले घरपोच पाठविल्याने पालक संतप्त झाले आहेत.  
...............
चौकशी करून योग्य ती कारवाई 
शिक्षणमंत्र्यांकडे अ‍ॅमेनोरा शाळेच्या शुल्कवाढी संदर्भात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी कोणतीही कृती शाळेने करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र तरीही शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठविल्याच्या तक्रारी पालकांकडून आल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- मिनांक्षी राऊत, शिक्षण उपसंचालक

Web Title: 200 students certificate sent home by Courier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.