आळंदीत पाणीपुरवठा विस्कळीत , जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:52 AM2017-12-10T01:52:12+5:302017-12-10T01:52:19+5:30
आळंदी आळंदी शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्षभरापूर्वी नव्याने बांधलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची दुरुस्ती आणि पंपिंग यंत्रणा चोकअप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : आळंदी शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्षभरापूर्वी नव्याने बांधलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची दुरुस्ती आणि पंपिंग यंत्रणा चोकअप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
आळंदीतील पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सिद्धबेट येथे नवा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे; मात्र सदोष कार्यपद्धतीमुळे आळंदीला विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आळंदीकर सध्या विकत पाणी घेऊन पीत आहेत. नवीन जलशुद्धीकरण यंत्रणेचे फिल्टर बेड खराब झाले असून वाळू बदलण्याचे काम सुरू आहे. याशिवाय पंपिंगची यंत्रणाही चोकअप केंद्र सध्या पूर्णपणे बंद आहे. यामुळे जुन्या प्रकल्पातूनच शहराला पाणी वितरित केले जात आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र जलशुद्धीकरण केंद्रात वाळू बदलण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती दिली आहे; मात्र प्रत्यक्षात हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. वर्षभरात नव्या जलशुद्धीकरण केंद्राची वाळू खराब कशी झाली? दोन ट्रक वाळू काढली. पंपिंग यंत्रणा चोक अप झाली. यामुळे पालिकेचे नाव खराब होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराने नीट काम करावे; अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल, असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.
कोट्यवधी निधी वापरूनही नागरिकांना फायदा होणार नसेल, तर सरकारी यंत्रणांचा उपयोग काय? कंत्राटदाराने आळंदीसारख्या ठिकाणी अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कंत्राटदार बदलण्याची शिफारस शासनाला करू.
- वैजयंता उमरगेकर,
नगराध्यक्षा, आळंदी नगर परिषद
नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडल्याने जुन्या प्रकल्पावरून पाणी शुद्ध केले जात आहे. त्याची क्षमता कमी असल्याने आळंदीकरांना येत्या अकरा तारखेपर्यंत कमीदाबाने पाणीपुरवठा होईल; मात्र त्यानंतर सुरळीत
पाणीपुरवठा होईल.
- दत्तात्रय सोनटक्के,
पाणीपुरवठा विभागप्रमुख