अमित शहा झाले लेखक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:31 AM2017-09-08T02:31:33+5:302017-09-08T02:31:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत आहेत.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. १०) दुपारी साडेचार वाजता पुण्यात होत आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होईल. पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही आवृत्त्यांचे प्रकाशन शहा यांच्याच हस्ते होणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने हे पुस्तक प्रकाशित केले असून, भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी, हे या पुस्तकाचे नाव आहे. त्यात भाजपाच्या धोरणाची चिकित्सा केली असून, कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना बरोबरच सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी पक्षाची ध्येयधोरणे समजावित या हेतूने शाह यांनी पुस्तकाचे लेखन केले असल्याची माहिती दिली. प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी असतील. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख उपस्थित असतील. प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे व निमंत्रक योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली.