मालवाहतुकीबरोबर स्कूलबस राहणार बंद : देशव्यापी चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 08:17 PM2018-07-19T20:17:13+5:302018-07-19T20:23:41+5:30
संपूर्ण देशात टोलमुक्ती , डिझेल दर समान, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून (दि. २०) पुकारलेल्या बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदोलनाला स्कूल बस, इंटरसिटी आणि खाजगी कंपनीसाठी सेवा देणाऱ्या संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. मालवाहतुकदारांच्या आंदोलनात एक दिवस सहभागी होणार असल्याचे स्कूल बस संघटनेकडून सांगण्यात आले.
डिझेलची किंमत कमी करुन, देशभरातील डिझेल दर समान करावा, संपूर्ण देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम कमी करावा, टीडीएस, प्राप्तीकर आणि ई वे बिलातील जाचक अटी वगळाव्यात, जड वाहनांना दोन चालकांची सक्ती करु नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मालवाहतुकदारांबरोबरच इतर वाहतूक संगघटनाही आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्या आहेत.
या आंदोलनाच्या पार्वभूमीवर मालवाहतूकदार, स्कूल बस संघटना, पुणे डिस्ट्रीक्ट लक्झरी बस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (दि. १९) बैठक झाली. त्यात या तीनही संघटनांनी मालवाहतुकदारांच्या संपात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील स्कूल बसचालक शुक्रवारच्या संपात सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
पुणे बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे म्हणाले, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या साठी स्कूल बस चालक या संपात शुक्रवारचा दिवस सहभागी होतील. वाहतुक व्यवसायासंबंधीच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आंदोलन तीव्रतेने करण्यात येईल
मालवाहतूकदारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य मार्ग परिवहन व स्थानिक वाहतुक सेवेतील बसचा वापर करण्यात यावा. तसे, दूध, भाजीपाला, अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील यादी दक्षता घेण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहने अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या वाहने, तसेच कंत्राटी व टप्पा वाहतूक करणाऱ्या बस यामधून मालवाहतुकीस आांदोलन काळापुरती परवानगी देण्यात आली आहे. गृहविभागाने तशी अधिसूचना काढली आहे.