मावळमधील घाटाखाली चाललंय तरी काय? प्रश्न सुटेना अन् मतदारांचा ठाव लागेना

By श्रीनिवास नागे | Published: May 10, 2024 03:42 PM2024-05-10T15:42:39+5:302024-05-10T15:44:59+5:30

मतदारसंघात देशभरातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक अधिक. मावळ खोरं आणि कोकणपट्टीतली भौगोलिक रचना भिन्न, स्थानिकांची भाषा वेगवेगळी, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाजही वेगवेगळे. मतदारांच्या अपेक्षाही वेगवेगळ्या आणि प्रश्नही वेगवेगळे....

lok sabha election How about walking under the ghat in Maval? The question did not get resolved and the voters did not want to stop | मावळमधील घाटाखाली चाललंय तरी काय? प्रश्न सुटेना अन् मतदारांचा ठाव लागेना

मावळमधील घाटाखाली चाललंय तरी काय? प्रश्न सुटेना अन् मतदारांचा ठाव लागेना

मावळ लोकसभा मतदारसंघ लांबलचक पसरलेला. पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वसलेला आणि घाटावरचा-घाटाखालचा, अशा दोन विभागांत सरळ विभागलेला. घाटाखालचे रायगड जिल्ह्यातले कर्जत, पनवेल आणि उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येतात. पिंपरी-चिंचवडपासून लोणावळ्यापर्यंतचा भाग घाटावरचा. तिथून पुढचा घाटाखालचा. मतदारसंघात देशभरातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक अधिक. मावळ खोरं आणि कोकणपट्टीतली भौगोलिक रचना भिन्न, स्थानिकांची भाषा वेगवेगळी, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाजही वेगवेगळे. मतदारांच्या अपेक्षाही वेगवेगळ्या आणि प्रश्नही वेगवेगळे.

पहिला थांबा : खोपोली

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळ्यातून घाटाखाली उतरलं की खोपोली. कर्जत मतदारसंघातलं पहिलं शहर. आमची मतदारसंघाची सफर इथूनच सुरू झाली. नगरपालिका असली तरी बसस्थानकाला धड निवाराशेड नाही. त्यामुळं प्रवासी टपऱ्यांच्या सावलीला थांबलेले. दिलीप काशिनाथ तांबोळी हा पानटपरीवाला बोलू लागला, ‘खोपोलीतले रस्ते कधी होणार कुणास ठाऊक? पाणीपण कमी येतंय. महागाईवर सगळे गप्प बसलेत. खासदारांना दहा वर्षांत कधी बघितलं नाय. यंदा वातावरण संमिश्र दिसतंय बघा.’ बोलणं ऐकून संतोष तांडेल हा रिक्षाचालक पुढं आला. ‘कर्जत-पनवेल रेल्वेचं काम सुरू झालंय. हायवेचं कामपण झालंय, म्हणून मोदींसाठी युतीला मत देणार,’ तो सांगत होता.

तेवढ्यात दुसरा रिक्षाचालक दीपक जाधव आला. ‘इथं मोठं हॉस्पिटल नाही. त्यामुळं सिरिअस पेशंटला १२ किलोमीटरवरच्या लोणावळ्याला पळवावं लागतं. दुसऱ्या जिल्ह्यात रिक्षा न्यायची तर परवाना काढावा लागतो. तो काढण्याची ऑनलाइन सोय नाही. स्वत: जाऊन काढण्यात वेळ जातो. तो नसेल तर पोलिस येऊ देत नाहीत. म्हणजे मावळवाल्यांना आमची मतं चालतात; पण आमची रिक्षा चालत नाही होय?’ त्यानं विचारलं. भौगोलिक सलगता असली तरी शासकीय नियमांची पाचर यांना त्रासदायक ठरतेय.

दुसरा थांबा : कर्जत

पुणे-मुंबईचा मध्यवर्ती भाग म्हणजे कर्जत-खालापूर तालुके. त्यांचा मिळून बनलेला कर्जत हा हिरवागार मतदारसंघ. खालापूरसारखी औद्योगिक वसाहत कर्जतला नाही. खालापूर एमएमआरडीए क्षेत्रात आहे, तर कर्जत नाही. विधानसभा मतदारसंघ एक असला तरी ग्रीन झोनमुळं हा भेद. खोपोलीतून कर्जतकडं जाण्यासाठी निघालो. खोपोली-कर्जत चौपदरी रस्ता टकाटक झालाय. रेल्वेमार्गाला समांतर. वेशीवरच रामदासशेठ ठाकरेंचं ‘ठाकरे हॉटेल’. भजी-वडापावसाठी फेमस. गल्ल्यावर बच्चू नाना मस्के बसलेले. ‘हल्ली राजकारणात पैसा बोलतोय. तुकडे झालेत सगळे. निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही बघा. मुद्द्यावर निवडणूक नाहीच. मुद्दे कधीच संपलेत...’ अगतिक होऊन ते बोलत होते. कर्जत आता तिसरी मुंबई बनतंय. अपुरं पाणी, सांडपाणी, भूमिगत गटारी, वाहतूक कोंडी या प्रश्नांवर कुणी बोलत नाही, असं त्यांचं म्हणणं. महायुतीच्या उमेदवारासाठी संध्याकाळी चौक फाट्यावर नितीन गडकरी यांची सभा होती. त्याचे होर्डिंग्ज लागलेले.

तिसरा थांबा : रसायनी, पनवेल

पनवेलच्या अलीकडं रसायनी. कारखान्यांचं जाळं दिसायला लागतं. रसायनांचा वास नाकात घुसू लागतो. एका कंपनीबाहेरच्या झाडाखाली थांबलो. पत्रकार म्हणून सांगताच चहा पीत थांबलेले कामगार पुढं आले. एकेकाळी कंपन्या दाटीवाटीनं उभ्या होत्या; पण हल्ली अनेक कंपन्यांना टाळं लागलंय. बेरोजगारी आ वासून उभी राहतेय. कामगारांसाठी एकही सुसज्ज रुग्णालय इथं नाही. अनधिकृत रसायनयुक्त यार्ड, वाहतूक कोंडीनंही डोकं वर काढल्याचं कामगार सांगत होते. ‘कुणाला करायचं मतदान? सगळे सारखेच. मावळमधनं दरवेळी घाटावरच्याच लोकांना चान्स मिळतोय. आमाला कधी?’ एक-दोघे बोलले. खालापूरच्या पातळगंगा एमआयडीसीतही हेच चित्र असल्यानं तिकडून दोघे इकडं आलेले.

चौथा थांबा : उरण

उरण-पनवेल हा औद्योगिक पट्टा. पनवेलवरून संध्याकाळी उरणला पोहोचलो. तिन्ही तालुक्यांत आगरी-कोळी समाजाची संख्या लक्षणीय. कातकरी-कष्टकरी आणि सधन आगरी समाज, अशी सरमिसळ. उरण हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लागून असलेला मतदारसंघ. शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचं प्रभावक्षेत्र. ‘शेकाप’च्या कार्यालयाजवळ परशुराम पाटील हे कार्यकर्ते भेटले. ते बोलले, ‘आम्ही कायमच आंदोलनात उतरलोय. त्यामुळं महाआघाडीला यश मिळणार. उरण-पनवेलकरांनी नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे ‘नैना हटाव’च्या मागणीसाठी आंदोलनं केलीत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची घोषणा झाली, प्रस्ताव गेल्याचं सांगितलं; पण पुढं हालचाली थांबल्यात. हे मुद्दे घेतलेत.’ उरण-केगाव विभागातील सेफ्टी झोनमुळे शेकडो वर्षांपूर्वीची गावं अनधिकृत ठरण्याचा धोका असल्याचंही सांगत त्यांनी निरोप घेतला.

कर्जत परिसरात तीन-चार हजार फार्महाउस -

मुंबईपासूनजवळ असल्यानं कर्जत परिसरात तीन-चार हजार फार्महाउस आहेत. मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी जमिनी घेऊन ठेवल्यात. बरीचशी भाड्यानं देतात, तर काही स्वत:च्या विरंगुळ्यासाठी ठेवल्याची माहिती गणेश भोसले हा हॉटेल व्यावसायिक पुरवतो. दिवंगत नितीन चंद्रकांत देसाईंचा ‘एनडी स्टुडिओ’ याच परिसरातला. कर्जत-पनवेल रस्त्यावर तो दिसतोच. पुढं अष्टविनायकांमधल्या महाडच्या वरदविनायकाकडं जाणारा फाटा येतो.

ते ‘डान्स बार’ झाले ‘लाइव्ह ऑर्केस्ट्रा बार’

पनवेलजवळच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) असल्यानं एमआयडीसी रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे कंटेनर, लॉजिस्टिक कंपन्यांची गुदामं दिसतात. एकेकाळी कुप्रसिद्धी मिळवलेले डान्स बार आता ‘लाइव्ह ऑर्केस्ट्रा बार’ झालेत. तेही पुणे-मुंबई जुन्या हायवेवर दिसतात. आता त्यांची रया गेल्याचं स्पष्ट दिसतंय.

Web Title: lok sabha election How about walking under the ghat in Maval? The question did not get resolved and the voters did not want to stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.