गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, पुण्याच्या पाण्याची लावली वाट; पुणेकरांचा भाजपाला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:50 AM2019-01-20T11:50:49+5:302019-01-20T12:05:42+5:30
पुण्यामध्ये पाण्यावरुन राजकारण पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे.
पुणे : पुण्यामध्ये पाण्यावरुन राजकारण पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपावर टीकास्त्र सोडणारे पोस्टर्स पुणे शहरात लावण्यात आले आहेत. ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट… शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट'', अशा आशयाची पोस्टरबाजी करत पुणेकरांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
गल्ली ते दिल्ली तुमचा थाट आहे. पुणे शहरात शंभर नगरसेवक आणि आठ आमदार असून देखील भाजपानं पुण्याच्या पाणी प्रश्नाची वाट लावली, असे पोस्टर्स भाजपाच्या कारभाराला कंटाळलेल्या पुणेकरांनी लावले आहेत.
पाणीपुरवठ्याच्या पूर्वसूचना न देता पुणेकरांचे पाणी तोडल्यास पोलिसांकडे तक्रार करणार, असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. जलसंपदा विभागाला पाणी कपात करायची असेल तर मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात यावा. ताेपर्यंत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेऊ नयेत. पुणेकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन देखील टिळक यांनी केले.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना पुणेकरांना हक्काचे पाणी मिळत नाही. पुण्याच्या पाणी पुरवठ्याची पूर्ती वाट लागली असताना गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजपा कोणतीही ठोस भूमिक घेत नसल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, जलसंपदा विभागाच्या वतीने 16 जानेवारीला दुपारी तीन वाजता पालिकेला पाणीपुरवठा करणारे दोन पंप बंद करण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता सिंचन विभागाकडून पाणी बंद केले जात आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.