कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

By श्रीकिशन काळे | Published: April 28, 2024 05:49 PM2024-04-28T17:49:59+5:302024-04-28T17:50:11+5:30

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Rain forecast in state due to low pressure area Heat wave in Konkan for next 2 days | कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

पुणे : महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. सध्या कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अशा वेळी हवेचे दाब कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. परिणामी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असते. अशी स्थिती असल्याने आज (दि.२८) व उद्या (दि.२९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 

राज्यामध्ये ३० एप्रिल ते ४ मे पर्यंत हवामान कोरडे राहील. कोकणात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिथे आज (दि.२८) व उद्या (दि.२९) कोकणात यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहणार असून, त्यामुळे तिथेही आज व उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे परिसरात मात्र आकाश निरभ्र राहील आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असेल. 

ज्यावेळी वारे हवेच्या अधिक दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने जात असतात. तिथे मोठ्या प्रमाणावर ढग जमा होतात आणि पाऊस पडतो. त्या पावसाला पूर्वमोसमी पाऊस असे म्हटले जाते.  सध्या कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. बहुतांशी भागांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे.  
पुण्यात रविवारचे कमाल तापमान चाळीशीपार गेले आहे. परिणामी आज दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. तसेच किमान तापमान देखील चांगलेच वाढले आहे. वडगावशेरीला तर २९.९ किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुण्यातील किमान तापमान

वडगावशेरी - २९.९
इंदापूर - २८.९
मगरपट्टा - २८.६
चिंचवड - २८.१
कोरेगाव पार्क - २७.६
हडपसर - २७.१
लोणावळा - २४.२
शिवाजीनगर - २३.८

Web Title: Rain forecast in state due to low pressure area Heat wave in Konkan for next 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.