येरवड्यात सांडपाण्याचा पूर ; वाहतूकीला अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 12:13 PM2019-05-05T12:13:34+5:302019-05-05T12:15:13+5:30
आज सकाळी येरवडा भागातील सांडपाण्याची वाहणी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले. यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली हाेती.
विमाननगर : पुण्यात पाणी रस्त्यावर पाणी येण्याच्या घटना सुरुच आहेत. आज सकाळी येरवडा भागातील सांडपाण्याची वाहणी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले. यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली हाेती. वाहनचालकांना या सांडपाण्यातूनच मार्ग काढावा लागला. अखेर पुणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीन तास शाेध घेतल्यानंतर ही समस्या साेडविण्यात आली. परंतु ताेपर्यंत येथील रहिवासी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पुण्यात कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पूल वसाहतीत शिरल्याने गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेकांचे संसार रस्त्याावर आले हाेते. त्यानंतर पुन्हा एकदा जलवाहिनीचा वाल्व्ह नादुरुस्त झाल्याने पाणी रस्त्यावर आले हाेते. काही दिवसांपूर्वी देखील जनता वसाहत येथे पाणी शिरले हाेते. अशा घटना वारंवार घडत असताना आज पुन्हा येरवडा भागात सकाळी सांडपाण्याची वाहिनी तुंबली. त्यामुळे येरवडा गाडीतळ ते गुंजन चाैकापर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी आले हाेते. या घाणेरड्या पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील या प्रकारामुळे अडचणींचा सामना करावा लागले.
या प्रकारामुळे या भागात वाहतूककाेंडी देखील झाली हाेती. शेवटी तीन तासानंतर तुंबलेल्या वाहिनीतील अडकलेल्या वस्तू काढल्यानंतर पाण्याचा लाेंढा कमी झाला. या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली हाेती. सांडपाणी तुंबल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.