पिंपरीत शिवसेनेचा पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात सायकल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:01 PM2018-05-30T17:01:28+5:302018-05-30T17:01:28+5:30
शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार अशा सर्वच घटकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. इंधन दरवाढीच्या विरोधातील जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी सायकल मोर्चा काढण्यात आला.
पिंपरी : पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेत बुधवारी सायकल मोर्चा काढला. घोषणाबाजी करीत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन सर्वसामान्यांचे बजेटच कोलमडून टाकणाऱ्या भाजप सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली.
पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने बुधवारी मोरवाडी चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चा काढला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोचार्चा समारोप करण्यात आला. इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा, कहा गये..कहा गये..अच्छे दिन कहा गये... कब मिलेंगे.. कब मिलेंगे.. १५ लाख कब मिलेंगे..मोदी सरकार मुदार्बाद, अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहरसंघटक सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
खासदार बारणे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले नसताना आपल्या देशात इंधनाचे दर का वाढले आहेत. वास्तविक ३५ रुपये लिटरने मिळू शकणारे पेट्रोल ८५ रुपये लिटरने विकत घ्यावे लागत आहे. सरकारने इंधनावर तब्बल ६६ टक्के कर लावला आहे. त्यामुळे दुप्पट किमतीने इंधन खरेदी करावे लागत आहे. भाजपने जनतेला आश्वासन देताना महागाई कमी करु, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावात दीड पट वाढ करु, मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योग आणू, रोजगार निर्मिती करू, अशी आश्वासने दिली होती. मात्र शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार सर्वच घटकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी मोर्चा काढण्यात आले.
आमदार चाबुकस्वार म्हणाले, इंधनाची दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी दरवाढ असून, सरकारला महागाई कमी करण्याचा विसर पडला आहे. सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून, कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. आकाशाला भिडलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सलग १५ दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये ८ ते १० रुपयांनी स्वस्त इंधन मिळत आहे. त्यामुळे सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तत्काळ कमी करावी.