महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना मिळणार विनामुल्य सॅनिटरी नॅपकिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:15 PM2018-05-24T13:15:21+5:302018-05-24T13:15:21+5:30
चुकीच्या पद्धतीने या काळात स्वच्छता ठेवण्यात येते व त्याचा परिणाम किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर होतो असे सर्वेक्षणात आढळले आहे.
पुणे: महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना विनामुल्य सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांनी ही माहिती दिली.
महापालिकेच्या शाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे २३ हजार विद्यार्थिंनींना या निर्णयाचा फायदा होणार आहे. योजनेचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात या नॅपकिन्सची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. नवले यांनीच हा प्रस्ताव मांडला होता व त्याला नगरसेविका मनिषा लडकत यांनी अनुमोदन दिले. या विषयाची पुरेशी माहिती कुटुंबाकडून मिळत नाही, अशास्त्रीय पद्धतीने या काळात स्वच्छता ठेवण्यात येते व त्याचा परिणाम किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर होतो असे सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती नवले यांनी दिली.
खुल्या बाजारपेठेत असणारे नॅपकिन्स महाग असतात. महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थींनी असतात. त्यांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे त्या हा खर्च करत नाही व अशास्त्रीय पद्धतीने स्वच्छता ठेवतात. त्याला यामुळे आळा बसणार आहे असे नवले यांनी सांगितले.