अतिरिक्त फी भरण्यास नकार दिल्याने पंधराशेहून अधिक विद्यार्थ्याचे रिझल्ट रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:11 PM2024-05-01T16:11:13+5:302024-05-01T16:11:43+5:30

राज्यभर महाराष्ट्र दिनाची धामधूम असतानाच उरणमध्ये मात्र पालक विद्यार्थ्यांना न्यायासाठी पोलिसात धाव घ्यावी लागल्याने शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिकांमध्येही संतापाचा पारा चढला आहे.

The results of more than fifteen hundred students were withheld due to refusal to pay additional fees | अतिरिक्त फी भरण्यास नकार दिल्याने पंधराशेहून अधिक विद्यार्थ्याचे रिझल्ट रोखले

अतिरिक्त फी भरण्यास नकार दिल्याने पंधराशेहून अधिक विद्यार्थ्याचे रिझल्ट रोखले

उरण (मधुकर ठाकूर): उरणमधील नामांकित युईएस इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने ओळखपत्र, डायरी, ई-लर्निंगची अतिरिक्त फी न भरणाऱ्या विद्यार्थ्याचे रिझल्ट देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. राज्यभर महाराष्ट्र दिनाची धामधूम असतानाच उरणमध्ये मात्र पालक विद्यार्थ्यांना न्यायासाठी पोलिसात धाव घ्यावी लागल्याने शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिकांमध्येही संतापाचा पारा चढला आहे.

उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची १२ पर्यंत शाळा आहे. या शाळेत ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र पालक-शिक्षक संघटनेला अंधारात ठेवून विद्यार्थ्यांकडून ओळखपत्राच्या नावाखाली ५५०, डायरी-१००, ई-लर्निंग-१२०० अशी अतिरिक्त फीची रक्कम शाळा व्यवस्थापनाकडून वसूल करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन मनमानीपणे विद्यार्थ्यांकडून वसुल करीत असलेल्या अतिरिक्त फी वसुलीला पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थ्यांनी याआधीच विरोध दर्शवुन निषेध नोंदवला आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन विरोधात पालक-शिक्षक संघटना,पालक, असा मागील वर्षापासूनच संघर्ष सुरू झाला आहे.

शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात याआधीच शिक्षण विभागाकडे पालक-शिक्षक संघटना, पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र मुजोर बनलेल्या शाळा व्यवस्थापनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्षच केल्याने शाळा व्यवस्थापन विरोधात पालक-शिक्षक संघटना, पालकांचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.

दरम्यान राज्यभर महाराष्ट्र दिनाची धामधूम असतानाच आज सकाळीच रिझल्ट आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी व पालकांना शाळा व्यवस्थापनाने आधी ओळखपत्र, डायरीचे पैसे भरा तरच रिझल्ट मिळेल असे सांगत रिझल्ट देण्यास चक्क नकार दिला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालक - शिक्षक संघटनेच्या बैठकीत अतिरिक्त फी आकारणी करण्यासाठी कोणताही लेखी ठराव घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त फी वसुलीची कार्यवाही तत्काळ थांबविण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागानेही २९ एप्रिल २०२४ रोजी ओळखपत्र, डायरी आदी अतिरिक्त फी वसुलीसाठी कोणत्याही विद्यार्थ्यांचे रिझल्ट रोखणार नाही असे लेखी आदेश दिले आहेत.

मात्र शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून शाळा व्यवस्थापनाने बुधवारी (१) मनमानीपणे अतिरिक्त फी न भरणाऱ्या विद्यार्थ्याचे रिझल्ट देण्यास नकार दिला.यामुळे संतप्त झालेल्या पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,पालक, विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करत निषेध केला. इतक्यावरच न थांबता संताप अनावर झालेल्या शेकडो पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,पालक, विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात कॅपिटेशन ॲक्ट तरतूदींचा भंग केल्याप्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा नोंद करण्यासाठी उरण पोलिस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी शाळा व्यवस्थापन आणि पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. गुन्हा दाखल करण्याची तंबी देताच वठणीवर आलेल्या शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त 
फी वसुली न करताच विद्यार्थ्यांना रिझल्ट देण्याचे मान्य केले. तसे संदेश पालकांना व्हॉट्सॲपवर कळविण्यासही संमती दिली.यानंतरच पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पालक माघारी परतले.

१५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे रिझल्ट रोखून

दरम्यान पालक शिक्षक संघटनेचा विरोध आणि संघर्षानंतरही शाळा व्यवस्थापनाने दबावतंत्राचा अवलंब करून विद्यार्थ्यां-पालकांकडून सक्तीने अतिरिक्त फी वसूल केली आहे. तरीही ३००० विद्यार्थ्यांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक पालक-विद्यार्थ्यांनी अतिरिक्त फी भरण्यासाठी विरोध केला आहे. त्यामुळे अतिरिक्त फी न भरणाऱ्या १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे रिझल्ट शाळा व्यवस्थापनाने रोखुनी ठेवले आहेत. अशी माहिती पालक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा ॲड. प्रतिभा भालेराव यांनी दिली.

Web Title: The results of more than fifteen hundred students were withheld due to refusal to pay additional fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.