सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:16 PM2024-04-19T18:16:31+5:302024-04-19T18:17:24+5:30

Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

Big development regarding Sangli seat Rahul Gandhi phone call to Uddhav Thackeray | सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?

सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?

Sangli Lok Sabha Seat ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा सर्वाधिक वादग्रस्त ठरली. कारण या जागेवर काँग्रेसने दावा केलेला असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. अनेक दिवस मागणी करूनही उद्धव ठाकरेंनी सांगलीबाबत लवचिकता दाखवण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या जागेसाठी मतदानाची तारीख जवळ येत असतानाच काँग्रेसनेही अजूनही आशा सोडली नसून विविध नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना गळ घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. काल बाळासाहेब थोरात यांनी सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्यानंतर आज थेट काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंकडे विनंती केल्याची माहिती आहे. राहुल गांधींच्या या विनंतीला आता उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, एकीकडे काँग्रेसकडून अजूनही सांगलीची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पदाधिकारी मात्र आघाडी धर्म पाळण्यासाठी चंद्रहार पाटील यांच्यासोबत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्ह्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी संजय राऊत, जयंत पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा सुरू झाली.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विक्रम सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "सांगली जिल्ह्यातील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष इथं उपस्थित आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून जे आदेश आले, त्यानुसार मी इथे आलो. आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. जी काही आधी प्रक्रिया झाली, त्यात ही जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढलो," असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या तरी भाजपतर्फे खासदार संजय पाटील, उद्धवठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील, असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असल्याचं चित्र आहे. यामध्ये पुढील काही दिवसांत काही बदल होणार का, हे पाहावं लागेल. 
 

Web Title: Big development regarding Sangli seat Rahul Gandhi phone call to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.