सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी

By हणमंत पाटील | Published: May 2, 2024 10:30 PM2024-05-02T22:30:03+5:302024-05-02T22:30:44+5:30

सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे देशभर व राज्यभर सांगली लोकसभेची निवडणूक गाजली आहे. अखेर सांगलीची जागा मिळवीत उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

The campaign meetings were disrupted by the fierce fight in Sangli, the last two days of the veteran leaders jumped into the campaign | सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी

सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी

सांगली : सांगली लोकसभेची निवडणूक काँग्रेसमधील बंडखोरीने चुरशीची झाली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांची, तसेच महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिग्गज नेते प्रचार सभेत उतरविले आहेत. प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरल्याने दिग्गज नेत्यांच्या सभांचा धुराळा उडणार आहे.

सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे देशभर व राज्यभर सांगली लोकसभेची निवडणूक गाजली आहे. अखेर सांगलीची जागा मिळवीत उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली. दुसऱ्या बाजूला भाजपकडून सलग तिसऱ्यांदा खासदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप व संजय पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

सांगली लोकसभेच्या निकालावरून देशातील राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीची जागा जिंकण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार यांनी दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविले आहे. आता शेवटच्या दोन दिवसांत महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा सांगली, मिरज, विटा व तासगाव या मतदारसंख्या सर्वाधिक असलेल्या भागात होणार आहेत. सांगली लोकसभेसाठी मिरजेनंतर उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा गुरुवारी सांगलीत झाली. शरद पवार यांची तासगाव येथे सभा झाली. योगी आदित्यनाथ यांची सभा बुधवारी सांगलीत झाली. तर अमित शाह यांची सभा शुक्रवारी विट्यात (दि.३) आणि नितीन गडकरी यांची सभा रविवारी (दि.५) मिरजेत होणार आहे. त्यामुळे राजकीय सभानंतरचे वातावरण आपल्या बाजूने खेचण्यासाठी सर्व पक्षाचे उमेदवार व नेते कामाला लागले आहेत.

या नेत्यांच्या सभांचा धडाका... -
महायुती व महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांनाही सांगलीतील उमेदवारांच्या प्रचारात उतरविण्यात आले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत यांच्या सभांचा धडाका सुरू आहे.
 

Web Title: The campaign meetings were disrupted by the fierce fight in Sangli, the last two days of the veteran leaders jumped into the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.