थंड महाबळेश्वरही तापलं! साताऱ्याचा पारा ४१ अंशांवर
By नितीन काळेल | Published: May 2, 2024 07:02 PM2024-05-02T19:02:21+5:302024-05-02T19:04:05+5:30
अंगाची लाहीलाही; यंदाचे उच्चांकी तापमान
सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सातारा शहराचा पारा वर्षात प्रथमच ४१ अंशावर पोहोचला. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचे तापमानही ३५ अंशावर गेले. त्यातच तापमानात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली असून अजून एक महिना कसा काढायचा या विवंचनेत जिल्हावासीय आहेत.
सातारा जिल्ह्यात मागीलवर्षीपेक्षा यंदा कडक उन्हाळा आहे. सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. दुपारच्या सुमारास तर कडाक्याचे ऊन पडत आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे कमाल तापमानाने ४१ अंशाचाही टप्पा गाठला आहे. सातारा शहरात मंगळवारी ४१ अंशाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. त्याचवेळी जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा ३५.१ अंश नोंद झाला. त्यामुळे थंड हवेच्या महाबळेश्वरातही उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच ऊन वाढत गेले. पण, एप्रिल महिना हा सर्वाधिक उष्णतेचा ठरला. एप्रिलमध्येच सहावेळा सातारा शहराचा पारा ४० अंशावर गेला. त्यातच कायम तापमान हे ३९ अंशावरच राहिल्याचे दिसून आले. आता मे महिन्याला प्रारंभ झाला असलातरी उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी. माण, खटाव, फलटण या तालुक्यात उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. या तालुक्याच्या अनेक भागात ४२ अंशावर पारा गेलेला आहे. यामुळे गावागावांत शुकशुकाट जाणवत आहे. तर शेतीच्या कामावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळातही आणखी पारा वाढण्याची चिन्हे आहेत.
तीन दिवस पारा ४० अंशावर..
जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची मोठी लाट दिसून आली. त्यामुळे सलग तीन दिवस सातारा शहराचा पारा ४० अंशावर राहिला. दररोजच उच्चांकी पारा नोंद होत गेला. २८ एप्रिलला ४०.५, २९ रोजी ४०.७ आणि ३० एप्रिलला ४१ अंशावर तापमान होते. तर मे महिन्यातही तापमान वाढलेले आहे. गुरुवारी ४०.७ पारा नोंद झाला. यापुढेही जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील अससा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिना हा तापदायक राहण्याची चिन्हे आहेत.