कोयना धरणाने नव्वदी ओलांडली, गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी अधिक साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 03:14 PM2018-08-05T15:14:19+5:302018-08-05T15:14:38+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा जोर धरू लागला असून कोयना धरणात सध्या ९०.४७ टीएमसी इतका साठा झाला आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा जोर धरू लागला असून कोयना धरणात सध्या ९०.४७ टीएमसी इतका साठा झाला आहे. गतीवर्षीपेक्षा तो ५ टीएमसीने अधिक आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पण, १५ आॅगस्टपर्यंत पाणीपातळी नियंत्रणात ठेवावी लागत असल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कोयनासह सर्वच धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सध्या धोम, बलकवडी, उरमोडी आणि तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात २४५९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
कोयनानगर येथे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३७७६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कोयना येथे गतवर्षी ३३७६ मिलीमीटर पाऊस झाला होता. धोम येथे यंदा ४८८ तर गतवर्षी ४५१, कण्हेर येथे गतवर्षी ५३३, यावर्षी ५८२, उरमोडी येथे ८९५ तर यंदा ९०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
धोम ०२ ४८८
कोयना ५९ ३७७६
बलकवडी २० १८९६
कण्हेर ०२ ५८२
उरमोडी ०९ ९०२
तारळी २८ १६६०