महागाईच्या निषेधार्थ दुचाकी चक्क स्वच्छतागृहावर, इंधन दरवाढीचा अनोखा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 03:26 PM2018-10-07T15:26:28+5:302018-10-07T15:27:38+5:30
सार्वजनिक शौचालयावरच दुचाकी ठेऊन वारंवार होणा-या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात केला.
सातारा : आंतरराष्ट्रीय बाजारात सलग चार आठवड्यांपासून तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे ही वाढ सर्वसामान्यांच्या माथी मारून नुकसान भरून काढलं जात असल्याचं मत व्यक्त करत साता-यात शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी चक्क सार्वजनिक शौचालयावरच दुचाकी ठेऊन वारंवार होणा-या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात केला. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोलने नव्वदीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे महागाईत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. या महागाईला सामोरे कसे जायचे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
या दरवाढीबाबत अनेक राजकीय पक्ष, संघटना रस्त्यावर उतरून विविध मार्गाने शासनाचा निषेध केला आहे. परंतु याची झळ सर्वसामान्यांना बसत असून, त्यांनी काय करायचे. साता-यातील गुरुवार पेठेतील एका नागरिकाने निषेध व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक शौचालयाच्या स्लॅबवरच दुचाकी ठेवून गाडी चालविणे आता हवेतच, असा संदेश यातून व्यक्त केला असल्याचे नागरिक सांगत आहे.
दरम्यान, या ठिकाणाहून ये-जा करणा-या नागरिकांना हा प्रकार लक्षवेधी ठरत असून, असाही दरवाढीचा निषेध पाहून नागरिकांना दरवाढीची मनात धास्ती असली तरी चेह-यावर मात्र हसू दिसून येत आहे. महागाईचा सामना करण्यासाठी अनेकांनी सायकलचा आधार घेतला आहे. तर लांब पल्ल्याला जाण्यासाठी शहर बस व वडापचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शासनाने नुकतीच पेट्रोल व डिझेलच्या दरात काही प्रमाणात कपात केली असली तरी, सर्वसामान्य नागरिकांना मात्र, महागाईची झळ ही सोसावीच लागत आहे.