ठाणे महापालिका हद्दीत ६४ शाळा अनाधिकृत, इंग्रजी माध्यमाच्या ५१ शाळांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:51 PM2018-05-30T17:51:01+5:302018-05-30T17:51:01+5:30
ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील अनाधिकृत शाळांच्या यादीत तब्बल ६४ शाळांचा समावेश असून यामध्ये इंग्रजी शाळांचा आकडा हा चढा असल्याचे स्पष्ट झाले. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असे आवाहन शिक्षण विभागाने केले असले तरी येथे शिक्षण घेत असलेल्या १० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अधातंरी आले आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अनाधिकृत शाळांच्या यादीचा आकडा यंदा वाढला आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत तब्बल ६४ शाळा या अनाधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या तब्बल ५१ शाळा असून मराठी माध्यमाच्या ३ आणि हिंदी माध्यमाच्या १० शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये आजच्या घडीला १० हजार २६३ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचे भवितव्य मात्र धोक्यात आले आहे. तर या शाळांमध्ये ४९७ शिक्षक हे शिक्षण देण्याचे काम करीत असून त्यांच्यावर देखील बेकारीची कुऱ्हाड येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनाधिकृत शाळांची यादी प्रसिध्द केली जाते. या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते. परंतु यातील काही शाळा या मागील वर्षीच्या यादीत देखील होत्या. आता पुन्हा त्या शाळांचा समावेश देखील पुन्हा करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत अशा आताच्या घडीला ६४ शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकडा अधिकचा असलेला दिसून येत आहे. सध्या इंग्रजी शाळांना चांगली मागणी असल्याने नावजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही, त्यामुळे याचाच फायदा घेत झोपडपट्टी भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत असल्याचे मुख्य कारण असू शकते असा कयास शिक्षण विभागाने लावला आहे.
त्यातही या शाळा कळवा, राबोडी, दिवा, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी भागातच या शाळांचा आकडा अधिक असल्याचे दिसून आले आहे. खास करुन दिव्यात या अनाधिकृत शाळांचा आकडा अधिकचा असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीतून स्पष्ट होत आहे. त्यानुसार या भागात इंग्रजी माध्यमाच्या ५१ शाळा असून मराठी माध्यमाच्या ३ आणि ंिहदी माध्यमाच्या १० शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमधून तब्बल १० हजार २६३ विद्यार्थी शिक्षण घेण्याचे कार्य करीत असून त्यांना शिकविण्यासाठी ४९७ शिक्षक सज्ज आहेत. परंतु या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टाकू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले असून या शाळांदेखील दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.