शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:11 AM2018-04-22T05:11:01+5:302018-04-22T05:11:01+5:30
अनेक वर्षांपासून भार्इंदर पश्चिमेकडील १५० फूट मार्गावर सुरू असलेली ही शाळा दोन वर्षांपूर्वी मॅक्सस मॉल परिसरातील विशाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केली होती.
मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉल परिसरात असलेली रीना मेहता ही खाजगी शाळा परस्पर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण निर्माण झाल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांसह पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शनिवारी धरणे आंदोलन छेडले.
अनेक वर्षांपासून भार्इंदर पश्चिमेकडील १५० फूट मार्गावर सुरू असलेली ही शाळा दोन वर्षांपूर्वी मॅक्सस मॉल परिसरातील विशाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केली होती. शाळा संपूर्ण वातानुकूलित तसेच पहिली ते दहावीपर्यंत सुरू होती. विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम राहिल्याने शाळेला दरवर्षी तोटा सहन करावा लागत होता. अखेर, ती बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. तसे पत्र पालिकेच्या शिक्षण विभागाला देण्यात आले. त्याला मान्यता देण्याचा अधिकार राज्याच्या शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना असल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाने त्याचा अहवाल उपसंचालकांना पाठवला. उपसंचालकांनी शाळा बंद करण्याची परवानगी अद्याप दिली नसतानाही शाळा व्यवस्थापनाने ती परस्पर बंद केली. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. या शाळेत एकूण २१० विद्यार्थी पटसंख्या असल्याने पुरेशा विद्यार्थ्यांअभावीदेखील शाळेचे दिवाळे निघाल्याचे बोलले जात आहे. शाळा अचानक बंद झाल्याने त्यातील सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी इतर खाजगी शाळांत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्या शाळांनी डोनेशनची मागणी केल्याचा आरोप माकपने केला आहे.