वांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळ : २४ तासांनंतर मध्य रेल्वे रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:28 PM2017-12-02T14:28:37+5:302017-12-02T14:32:01+5:30
वांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळत्मुळे मध्य रेल्वेचे कल्याण-कर्जत वेळापत्रक सपशेल कोलडमले होते. मात्र शनिवारी पहाटेपासून लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या वेळापत्राकानूसार धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
डोंबिवली: वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान म्हशीला धडक दिल्याने इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे मध्य रेल्वेचे कल्याण-कर्जत वेळापत्रक सपशेल कोलडमले. त्यातच संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिवा-कल्याण मार्गावर लोकल सेवा पाऊण तास विलंबाने धावली. मध्यरात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेचा गोंधळ सुरु होता. शनिवारी पहाटेपासून मात्र लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या वेळापत्राकानूसार धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
शुक्रवारी दिवसभर मध्य रेल्वेचा घोळ सुरु होता, ट्रान्स हार्बर मार्गावरही ऐरोली स्थानकादरम्यान गोंधळ होता, पण शनिवारी गाड्या वेळेत होत्या. शासकीय कार्यालयांना शुक्रवारी इदनिमित्त सुटी होती, परंतू अन्य खासगी कंपन्यांना मात्र सुट्या नसल्याने त्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी कामावर जातांना आणि पुन्हा परतीच्या प्रवासात विशेषत: धीम्या डाऊन मार्गावरील प्रवासाला पाऊण तास विलंबाने झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अनेक प्रवाशांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त करणारे संदेश पाठवले, तर काहींनी संताप व्यक्त केला. शनिवारी रेल्वे सुरळीत असल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.