ठाणे महापालिका खोदणार शहरात यंदा पुन्हा ६० कुपनलिका, पाणी कपातीवर मात करण्यासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:38 PM2018-01-15T16:38:43+5:302018-01-15T16:44:23+5:30
पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी होऊ नये या उद्देशाने ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करण्यावर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, मागील वर्षी २४८ कुपनलिका खोदण्यात आल्यानंतर आता पुन्हा नव्याने ६० कुपनलिका खोदणार आहे.
ठाणे : मुबलक पाणी असतांनाही आजही ठाणे महापालिकेला पाणीकपात करावी लागत आहे. पावसाने पाठ फिरविल्यास ठाणेकरांना नैसर्गिक स्त्रोतांपासून पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने मागील दोन वर्षांपासून महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील शहरातील विहिरी आणि कुपनलिकांच्या दुरुस्तीसह नव्याने कुपनलिका खोदण्याचे कामही सुरूकेले आहे. त्यानुसार मागील वर्षी २४२ कुपनलिका नव्याने खोदल्यानंतर यंदा ६० कुपनलिका खोदण्यासंदर्भाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
महापालिका हद्दीत ९०७ कुपनलिका वापरात आहेत. शहराला आजघडीला सुमारे ४७० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या हे पाणी मुबलक असतांनादेखील ठाणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलावार पुन्हा एकदा उभी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक पाऊस झाला असला तरी एमआयडीसी आणि स्टेमकडून पाणीकपातीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही शक्यता लक्षात घेऊन ठाणेकरांना लागणारे पाणी नैसर्गिक स्त्रोतापासून उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने शहरातील अस्तित्त्वात असलेल्या कुपनलिका आणि विहिरींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. महापालिका हद्दीत आजघडीला ९०७ कुपनलिका आहेत. २०१० मध्ये हा आकडा ८१३ च्या घरात होता. आता त्यात वाढ झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. या कुपनलिकांमध्ये ८५ कुपनलिका या पॉवर पंपावर चालत आहेत. त्यांच्या पाण्याचा वापरदेखील उद्याने, गार्डन, शौचालये, रस्ते सफाई आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वापर केला जात आहे.
दरम्यान मागील वर्षी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २४२ कुपनलिका नव्याने खोदल्या असून त्यांचा वापर इतर कामांसाठी केला जात आहे. तर यंदादेखील ६० कुपनलिका खोदण्यात येणार असून यासाठी ९९ लाख ९७ हजार १८४ रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यामध्ये ५० पॉवर पंपावर चालणाऱ्या आणि १० हॅन्डपंपवर चालणाºया कुपनलिका असणार आहेत. या कुपनलिकांचा वापर नव्याने तयार झालेले आणि तयार होत असलेल्या गार्डनसाठी केला जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.