आणखी दोन महिने पाणीबाणी, पाणी कपातीचे प्रमाण आहे तेवढेच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:35 AM2019-05-06T01:35:49+5:302019-05-06T01:39:41+5:30

आॅक्टोबरपासून पाणी कपात सक्तीने लागू केल्यामुळे धरण साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे कपात कमी करण्याचे धोरण अवलंबण्याची शक्यता होती; मात्र यंदाच्या पावसाला विलंब होण्याची दाट शक्यता आहे.

There will be more water and water cut in the next two months | आणखी दोन महिने पाणीबाणी, पाणी कपातीचे प्रमाण आहे तेवढेच राहणार

आणखी दोन महिने पाणीबाणी, पाणी कपातीचे प्रमाण आहे तेवढेच राहणार

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे : आॅक्टोबरपासून पाणी कपात सक्तीने लागू केल्यामुळे धरण साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे कपात कमी करण्याचे धोरण अवलंबण्याची शक्यता होती; मात्र यंदाच्या पावसाला विलंब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाणी कपातीचे प्रमाण न वाढवता आहे तेवढेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र पाणी कपात वाढणार नसली, तरी ती लवकर बंदही होणार नाही. सुरळीत पाणी पुरवठा साधारणत: १५ जुलैपर्यंत केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

सध्या जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि एमआयडीसी परिसरात आठवड्यातून तीस तास पाणी कपात लागू आहे. या पाणी कपातीचे धोरण सक्तीने राबवले जात आहे. या २२ टक्के पाणी कपातीमुळे बारवी व आंध्र धरणातील पाणी उपसा कमी झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा शिल्लक आहे. त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी पाणी कपात कमी करण्याचे नियोजन होणार होते; मात्र निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत लागू केलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेणे शक्य झाले नाही. याशिवाय आताचा हवामानाचा अंदाज घेता यंदाचा पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी आहे तीच कपात पुढेही सुरू ठेवण्याचे धोरण आवलंबण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट केले जात आहे.

बारवी धरण व आंध्र धरणातील पाणी उल्हास नदीत सोडून त्यावर जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांची तहान भागवली जात आहे. एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण आणि महाराष्टÑ जीवन प्राधिकरण यांच्याव्दारे या पाण्याचा पुरवठा ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा भार्इंदर महानगरपालिकांसह अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांना होत आहे. या महापालिका व नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा केल्यामुळे बारवी धरणाच्या साठ्यात २२ टक्के पाण्याची तूट आॅक्टोबरमध्ये उघड झाली. त्यामुळे ३० तासाची पाणी कपात सक्तीने लागू केली आणि ती पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणच्या नागरिकांना वेगवेगळ्या दिवशी कपातीला तोंड द्यावे लागत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात या कपातीत वाढ होण्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पण तसे न होता आहे तीच कपात ठेवण्याचे धोरण स्विकारले जाणार आहे.

सक्तीमुळे झाला मुबलक साठा, चोरी थांबली

सक्तीच्या पाणी कपातीसह पाणी चोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यामुळे मंजूर पाणी कोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत करणे शक्य झाले. एवढेच नव्हे, तर रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरीदेखील थांबवणे शक्य झाले.

एमआयडीसीने ५८३ एमएलडी या मंजूर पाणी पुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसीने २३४ मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी जास्त पाणी उचलल्याची नोंद आहे. या खालोखाल एमजेपीने ९०
एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ या मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी उचलल्यामुळे यंदा पावसाळा संपताच पाणी कपातीला तोंड द्यावे लागले.

या सक्तीच्या उपाययोजनेमुळे मंजूर पाणी कोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण डोेंबिवली महापालिका (केडीएमसी) सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास काही अंशी आळा घालणे शक्य झाली आहे.


बारवीची पातळी ५७.७० मीटर

बारवी धरणाच्या ६८.६० मीटर पातळीपैकी आज रोजी या धरणाची पातळी ५७.७० मीटर एवढी आहे. सध्या ३२.२४ टक्के पाणी साठा आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी तो ४३.५२ टक्के होता. त्यानुसार धरणातील मुबलक पाणी साठा लक्षात घेऊन पाणी कपात कमी करण्याचे नियोजन होते.

परंतु पावसाळा लांबण्याचा अंदाज लक्षात घेऊन पाणी कपात आहे तशीच ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांनी नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दश लक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलणे अपेक्षित होते.

प्रत्यक्षात एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलण्यात आले. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी रोज करण्यात आली होती. यामुळे बारवी धरणाच्या पाणी साठ्यात २२ टक्के तूट उघड झाली. ती भरून काढण्यासाठी आॅक्टोबरपासून ही कपात लागू झाली होती.

Web Title: There will be more water and water cut in the next two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.