जिल्हाभरातील शाळांची घंटा वाजणार आता १ जुलैपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:50 PM2024-05-07T18:50:32+5:302024-05-07T18:51:18+5:30
Wardha : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानितच्या पहिली ते आठवीपर्यंत शाळांमध्ये शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शाळांची घंटा १ जुलैपासून वाजणार आहे. १९ एप्रिलच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व विद्याथ्यांना २२ एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली होती.
१८ एप्रिलच्या शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी १ मेपासून जाहीर करण्यात आली होती. तर २०२४-२५ या सत्रात विदर्भ वगळता सर्व विभागातील राज्य मंडळाची शाळा शनिवार १५ जूनपासून सुरू करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते. विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य मंडळाच्या सर्व शाळा ३० जून, रविवार येत असल्याने १ जुलैपासून सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यात काही शाळांचे निकाल ७ ते १५ मे दरम्यान जाहीर होणार आहे. त्यानंतर त्यांना शुक्रवारी तारीख १७ मेपासून सुट्ट्या लागणार आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मोफत पाठ्यपुस्तकांमध्ये प्राथमिक स्तरावर पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाने निधीची तरतूद केल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना होणार पुस्तकांचे वाटप
समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यंदा राज्यातील शाळांत ही पुस्तके तब्बल एक कोटी दोन लाख ९० हजार ४२० विद्यार्थ्यांना पुरविली जाणार आहे. त्यासाठी तीन कोटी १९ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पीएमश्री शाळांतील एक लाख ३९ हजार १५५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
यंदाही वह्यांची जोडलेली पाने असलेली पुस्तके
यंदाही वह्यांची जोडलेली पाने असलेली पुस्तके असणार आहे. ही पुस्तके आता नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवसापासून मिळावी, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
विविध भाषांतील पुस्तकांची मागणी
पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगू, सिंधी, अरबी, तामिळ आणि बंगाली माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ज्या शाळांकडून पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती, त्याप्रमाणे ही पुस्तके प्रत्येक शाळांना पुरवली जाणार असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाकडून देण्यात आली. बालभारतीच्या विभागीय भांडारातून ती तालुकास्तरापर्यंत पोहोचवली जाणार आहे.
शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे व शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय पाठ्य पुस्तकाचे वितरण केल्या जाणार आहे. तसेच यंदा जिल्हाभरातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहे.
- सुरेश पारडे, गटशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग पं. स. आर्वी,