देवतलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ११ हजारांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 02:46 PM2018-05-17T14:46:24+5:302018-05-17T14:46:24+5:30
स्थानिक मुस्लिम बोहरा समाजातील व्यावसायिक खोजेमा हुसेन यांनी स्वयंस्फूर्तीने तब्बल ११ हजार रुपयांची देणगी देवून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
वाशिम: दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या वाशिमकरांनी देवतलावातील गाळ उपसण्याचे काम हाती घेताच शहरातील सर्व समाज बांधव सरसावले असून, स्थानिक मुस्लिम बोहरा समाजातील व्यावसायिक खोजेमा हुसेन यांनी स्वयंस्फूर्तीने तब्बल ११ हजार रुपयांची देणगी देवून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. दरम्यान, या लोकोपयोगी कार्यासाठी आर्थिक मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे.
वाशिम येथील ऐतिहासिक देवतलावाच्या पुनरुज्जीवनासाठी नागरिक़, प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेतला असून, या तलावाचे खोलीकरण गेल्या १० दिवसांपासून वेगात सुरू आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते आपल्या परिने श्रमदान करतानाच आर्थिक सहाय्यही या कामासाठी करीत आहेत. अशात मुस्लिम बोहरा समाजातील व्यावसायिक खोजेमा हुसेन यांनीही या लोकोपयोगी कामांत आपला वाटा असावा म्हणून ११ हजार रुपयांची देणगी दिली. त्याशिवाय शहरातील मारवाडी महिला मंडळानेही पाच हजार रुपयांची देणगी देऊन, अशा लोकोपयोगी कार्यात महिलांचीही मदत असल्याची प्रचिती दिली, तसेच निजाम भाई यांनी २१०० रुपये देणगी दिली असून, या तलावाच्या खोदकामासाठी आर्थिक मदत करण्यास अनेक जण पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.