प्रशासनाच्या अंतर्गंत अडचणींमध्ये अडकली वाशिममध्ये होणारी विज्ञान प्रदर्शनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:40 PM2018-02-09T14:40:15+5:302018-02-09T14:49:04+5:30
वाशिम : विज्ञान प्रदर्शनी प्रशासनाच्या अंतर्गंत अडचणींमध्ये अडकली असून वाशिममध्ये ही प्रदर्शनी घेणे शक्य होणार नसल्याचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडे पाठविल्याची माहिती आहे.
वाशिम : पश्चिम वऱ्हाडातील वाशिम, अकोला आणि बुलडाणा या तीनही जिल्हयांमधील १६४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये ‘इन्स्पायर अवॉर्ड’ची प्रत्येकी १० हजार रुपये रक्कम गत आठ दिवसांपूर्वी जमा झाली. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांची वाशिममध्ये होणारी विज्ञान प्रदर्शनी प्रशासनाच्या अंतर्गंत अडचणींमध्ये अडकली असून वाशिममध्ये ही प्रदर्शनी घेणे शक्य होणार नसल्याचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडे पाठविल्याची माहिती आहे.
इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या प्रत्येक इयत्तेतील एका विद्यार्थ्यास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे ‘इन्स्पायर अवार्ड’अंतर्गत विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी १० हजार रुपयांचा निधी वितरीत केला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांसह सविस्तर अहवाल विद्या प्राधिकरणाकडे सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार, पश्चिम वºहाडातील शेकडो विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील अहवाल जून-जुलै २०१६ मध्ये सादर केला होता. त्यातून वाशिम जिल्ह्यात ७६, अकोला ५२ आणि बुलडाणा जिल्ह्यातून ४१ विद्यार्थ्यांची निवड झाली. संबंधित विद्यार्थ्यांना गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये रक्कमही संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाली आहे. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञान प्रतिकृती तयार करण्यास विद्यार्थ्यांनी प्रारंभ केला आहे. दरम्यान, पश्चिम वºहाडातील जिल्ह्यांची एकत्रित विज्ञान प्रदर्शनी वाशिममध्ये घेण्याचे ठरले होते. त्यानुसार, ३० जानेवारीपर्यंत ही प्रदर्शनी होणे क्रमप्राप्त होते. मात्र, यासाठी तीन जिल्ह्यांवर होणाºया खर्चासाठी केवळ २ लाख ५ हजार रुपये देण्यात आले. याशिवाय वाशिममध्ये विज्ञान पर्यवेक्षकासह इतरही अनेक पदे रिक्त असल्याने ही प्रदर्शनी वाशिममध्ये घेणे शक्य होणार नाही. ती अकोला येथे घेण्यात यावी, असे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी विद्या प्राधिकरणाकडे पाठविले आहे. त्यामुळे आता ही प्रदर्शनी अकोला येथेच होईल, असे निश्चित झाल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी सांगितले.
विज्ञान प्रतिकृती तयार करण्यास अपुरा वेळ!
गतवर्षी जून-जुलै महिन्यात विज्ञान प्रतिकृतीसह ‘आॅनलाईन’ माहिती सादर करणाºया विद्यार्थ्यांची जानेवारी २०१८ च्या अखेरच्या आठवड्यात निवड करून त्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली. त्यातून पुढील आठच दिवसात ठराविक विज्ञान प्रतिकृती तयार करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सादर करावी, असे आदेश देण्यात आले. मात्र, आठ दिवसाचा वेळ अपुरा असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.