वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांची अंमलबजावणी धिम्या गतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:52 PM2018-04-19T14:52:55+5:302018-04-19T14:52:55+5:30
वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.
वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे प्रश्न निकाली निघण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदा ५१० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार, असे गृहित धरून जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्येच ५७८ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला होता. त्यानुसार टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना, नळ योजना दुरूस्ती आदींसाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र मार्च महिन्यापासून जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असताना अद्याप त्यावर मात करण्यासाठी कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. म्हणायला, काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, तो नित्यनेम नसल्याने गावागावातील ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.
दुसरीकडे पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी, पशूपक्षी आणि जनावरांवरही पाणीटंचाईचे संकट कोसळले असून संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने पणीटंचाई कृती आराखड्याची चोख अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.